
“पेन्शन काढून देण्यासाठी मागितले २५००० रुपये लाच”
महाराष्ट्र न्यूज लाईव्ह
ज्ञानेश्वर चव्हाण, सोलापूर
मयत भावाचे पीएफ, मृत्यू विमा, पेन्शनची रक्कम काढण्यासाठी तक्रारदारने अर्ज केला होता. त्यावेळी साहेबांचे नाव सांगून २५ हजाराची लाच मागणारा खासगी व्यक्ती लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात अडकला आहे.
सलीम हशरफ शेख (रा. उत्तर सदर बझार, लष्कर) असे त्या संशयिताचे नाव आहे. तक्रारदाराचा भाऊ विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात २०१४ ते २०२३ या काळात शासनाने नेमल्याप्रमाणे पुजारी म्हणून काम करीत होता. २०२३ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी त्यांची पत्नी व भाऊ मयताचा पीएफ, मृत्यू विमा, पेन्शनचे बील काढण्यासाठी कर्मचारी भविष्यनिवार्ह निधी कार्यालयात अर्ज केला होता. त्यासाठी मयताचा भाऊ व पत्नी पाठपुरावा करीत होते.
पहिला हप्ता ३८ हजार रुपये मिळाले होते. उर्वरित बील काढण्यासाठी सलीम शेख याने स्वत:साठी व साहेबांसाठी म्हणून २५ हजाराची लाच मागितली. त्यासंदर्भात १३ ऑक्टोबर रोजी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात धाव घेतली होती.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर सलीम शेख याने पीएफ कार्यालयाजवळील आस्था हॉस्पिटलच्या बाजूला पहिला हप्ता पाच हजार रुपयांचा घेतल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सलीम शेख याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक रविंद्र लांभाते यांच्या नेतृत्वातील पथकाने पार पाडली. लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाचे पोलिस निरीक्षक शैलेश पवार तपास करीत आहेत.





