
“धरण नव्हे मरण”
महाराष्ट्र न्यूज लाईव्ह
ज्ञानेश्वर चव्हाण, यवतमाळ
चातारी परिसर आज “धरण नव्हे मरण!” या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांनी ऐतिहासिक जनसभा भरवून धरण प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करण्याची एकमुखी मागणी केली. या सभेला उमरखेड तालुक्यासह शेजारील हदगाव व हिमायतनगर परिसरातील तब्बल पाच हजारांहून अधिक शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
हे मोठ्या धरणांच्या नावाखाली आतापर्यंत हजारो कुटुंबे विस्थापित झाली, शेती उद्ध्वस्त झाली. धरण बांधण्यामागे मूळ उद्दिष्ट सिंचनाचे असले तरी वास्तवात एकाही धरणाने आपले उद्दिष्ट पूर्ण केले नाही.
केवळ २५% प्रत्यक्षात सिंचन होते. परंतु त्यासाठी हजारो एकर सुपीक जमीन कायमची पाण्याखाली गेली. त्यामुळे धरण म्हणजे शेतकऱ्यांसाठी मरण ठरत असल्याची संतप्त भावना या वेळी व्यक्त सभेमध्ये व्यक्त करण्यात आली.
सभा मंचावरून निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीचे प्रल्हाद पाटील जगताप, विजय पाटील राऊत, एड. बालाजी येरावार, प्रा. प्रदीप राऊत यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न आणि मागण्या ठळकपणे मांडल्या.
यावेळी मुबारक तवर माझी जिल्हा परिषद उपाध्यक्ष यवतमाळ व विजय राऊत यांनी तज्ज्ञांच्या अभ्यासावर आधारित तथ्यनिहाय माहिती सादर करून सहस्त्रकुंड प्रकल्प कसा जनहितविरोधी आहे हे स्पष्ट केले.
हा प्रकल्प केवळ काही ठराविक लोकांच्या स्वार्थासाठी उभारला जात आहे. स्थानिक शेतकऱ्यांना यात कोणताही फायदा नाही, उलट शेकडो गावे, हजारो शेतकरी कुटुंबे उद्ध्वस्त होणार आहेत.
सभा यशस्वी करण्यासाठी स्थानिक नागरिक, शेतकरी, महिला व युवक यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. चातारीच्या नागरिकांनी लोकवर्गणी करून या कार्यक्रमाला हातभार लावला.
यावेळी चातारीचे माजी सरपंच बंटी माने, साहेबराव धात्रक, विशालराव माने, माजी सरपंच अश्विन माने आदींसह स्थानिक नेत्यांचीं. उपस्थिती लक्षणीय ठरली. युवकांचा पुढाकार उल्लेखनीय ठरला.
चातारी येथील नवयुवकांनी सभा आयोजित करण्यात पुढाकार घेऊन शेतकऱ्यांचा संघर्ष अधिक प्रभावी करण्याची हमी दिली.





