
“आमदार अर्जून खोतकर यांच्या अडचणीत वाढ”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
दिलीप चव्हाण, इंदापुर
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आमदार अर्जून खोतकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण खाटीक समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान करणे आमदार खोतकर यांच्या अंगलट आले आहे.
त्यांच्या विरोधात इंदापूर तालुक्यातील भिगवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, भिगवण पोलिसांनी हा गुन्हा पुढील तपासासाठी जालना पोलिसांकडे वर्ग केला आहे.
बारामती येथील खाटीक समाजाचे कार्यकर्ते करण सुनील इंगुले यांनी याबाबतची फिर्याद भिगवण पोलिस ठाण्यात दिली आहे. त्या फिर्यादीवरून शिवसेनेचे आमदार अर्जून खोतकर यांच्या विरोधात भिगवण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आमदार अर्जून खोतकर यांनी खाटीक समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर आमदार खोतकर यांच्या विरोधात खाटीक समाजाच्या वतीने बारामतीसह राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले होते. बारामती येथील करण इंगुले यांनी ‘अर्जून खोतकर यांच्या विरोधात जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता.
बारामतीच्या प्रशासकीय भवनासमोर करण इंगुले यांनी काही दिवस उपोषणही केले होते. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवरही कमालीचा दबाव होता. अखेर भिगवण पोलिसांनी अर्जुन खोतकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदार अर्जुन खोतकर यांनी सलग दोन दिवस खाटिक समाजाबद्दल आक्षेपार्ह विधाने केली होती. त्यांच्या विधानामुळे खाटिक समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या हेात्या. त्यामुळे या प्रकरणी आमदार खोतकर यांच्या विरोधात ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी समाज बांधवांकडून करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.