
“ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात पुणे महापालिका राज्यात अव्वल”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
दिलीप चव्हाण, पुणे
राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी १५० दिवसांच्या ‘ई-गव्हर्नन्स’ सुधारणा कार्यक्रमात पुणे महापालिकेने राज्यातील सर्व महापालिकांमध्ये अव्वल क्रमांक पटकावला आहे. तंत्रज्ञानाधारित उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुणेकरांना हा बहुमान मिळाला आहे.
मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत, राज्यभरातील महानगरपालिकांपैकी केवळ पुणे महापालिकेची निवड करण्यात आली. या वेळी आयुक्त नवलकिशोर राम यांनी पुणे महापालिकेने राबवलेल्या ई-गव्हर्नन्स प्रकल्पांचा सविस्तर अहवाल सादर केला. अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. उपस्थित होते.
पुणे महापालिकेने मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये ३६ मायक्रो-साइट्ससह एक नवीन, मोबाइल-फ्रेंडली वेबसाइट विकसित केली आहे. या संकेतस्थळाला वर्षाला ६७ लाखांहून अधिक नागरिक भेट देतात. गेल्या वर्षभरात १.१५ लाख तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे.
जून २०२५ पासून संपूर्ण कामकाज ई-ऑफिस प्रणालीद्वारे केले जात असून, २५०० पेक्षा जास्त अधिकारी-कर्मचारी या प्रणालीचा वापर करीत आहेत. ४० विभागांतील ५०० प्रमुख कामगिरी निर्देशकांसह एक केंद्रीय डॅशबोर्ड विकसित केला जात आहे. त्यापैकी २० डॅशबोर्ड आधीच तयार झाले आहेत.
याशिवाय आयुक्त कार्यालयात ‘पी.एम.सी स्पार्क’ नावाने वॉर रूम सुरू करून ५० प्रकल्पांचा पंधरवड्यातून एकदा आढावा घेतला जात आहे. व्हॉट्सअॅप चॅटबॉटचा वापर करून मिळकतकराची बिले व नोटिसा वितरित केल्या जात आहेत. लवकरच थकबाकीदारांकडून कर वसुलीसाठी व्हॉइस बॉट व एआय-आधारित उपाययोजना राबवण्याची तयारी आहे असेही आयुक्तांनी सांगितले.