
“पिंपरी-चिंचवडमधील 70 एकर जागेस महसूलमंत्र्यांची मान्यता”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
दिलीप चव्हाण, पुणे
महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी असलेल्या पुण्यात मानाचा तुरा खोवला जाणार आहे. सुमारे ७० एकर जागेवर पिंपरी-चिंचवड शहरात आता “इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजे,भारतीय व्यवस्थापन संस्था” (आय.आय.एम) स्थापन केली जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोशी येथे आय.आय.एम कॅम्पससाठी जागा दिली आहे. सध्या देशात २१ भारतीय व्यवस्थापन संस्था (आय.आय.एम) कार्यरत आहेत. महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जिथे मुंबई व नागपूर अशा दोन आय.आय.एम आहेत.
आयआयएम नागपूरची शाखा सुरू होत आहे. यासाठी गेले वर्षभर यासाठी पाठपुरावा सुरू होता. उद्योग नगरी, कामगार नगरी, आयटी हब आणि ऑटो हब अशी ओळख असलेल्या पुणे जिल्ह्यात देशातील व्यवस्थापन क्षेत्राची उच्चतम संस्था प्रारंभ करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मानस पूर्ण होत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासाठी पुणे, मुंबई व नागपुरात काही बैठकी घेतल्या. दरम्यान, महसूल मंत्री यांनी मोशी येथील ७० एकर जागेला मान्यता दिली आहे. यामुळे ‘आय.आय.एम’ च्या कामाला आता गती मिळेल.
भूसंपादनाची प्रक्रिया प्रारंभ होत आल्याने आपण आनंदी आहोत, असे सांगून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, गणेश आगमनाचा उत्साह सुरू असतानाच शहरात आता आयआयएम सारखी नामांकित संस्था सुरू करण्याच्या कार्याचा खऱ्या अर्थाने ‘‘श्रीगणेशा’’ झाला आहे. पिंपरी-चिंचवड हे औद्योगिक शहर असून येथे देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरिक वास्तव्यास आहेत. मुंबई-पुणे कनेक्टिव्हीटी, औद्योगिक विकास आणि शैक्षणिक वातावरण लक्षात घेता आय.आय.एम. सारखी संस्था सुरू होणे हे शहरासाठी अभिमानास्पद आहे.