
“३०० कोटींच्या संपत्तीसाठी सुनेने केला सासऱ्याचा खून”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
दिलीप चव्हाण, नागपुर
सासरच्या 300 कोटींच्या मालमत्तेसाठी कट रचून सासऱ्याची हत्या करणाऱ्या सुनेचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला. न्या. उर्मिला जोशी फाळके यांच्या खंडपीठासमक्ष सुनावणी झाली.
या जामीन अर्जाला विरोध दर्शवताना दरम्यान सरकारी वकील नीरज जावडे यांनी सीसीटीव्ही फुटेजचा संदर्भ देत आरोपीने घटनास्थळी वाहने बदलल्याचे तसेच पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती दिली. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरून, सून अर्चना पुट्टेवार हिचा जामीन अर्ज फेटाळला.
अर्चनाच्या वकिलांनी जामिन अर्जावर सुनावणीदरम्यान सांगितले की, अटकेच्या वेळी कलम ५० सी.आर.पी.सीचे पालन झाले नसून, तिला अटकेची कारणे सांगितली नाहीत, ज्यामुळे तिची अटक अवैध ठरल्याचा युकिवाद केला.
त्यांनी असेही म्हटले की संपूर्ण प्रकरण परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित आहे आणि तिच्याविरुद्ध कोणताही थेट पुरावा नाही. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत, तपासाचे कागदपत्र तपासल्यानंतर, आरोपी विरुद्ध प्राथमिक पुरावे असल्याचे मान्य केले व वरील आदेश दिला.
नेमकी घटना काय?
आरोपी महिलेचे नाव अर्चना पुट्टेवार आहे. ती गडचिरोलीच्या नगर नियोजन विभागात सहायक संचालक म्हणून कार्यरत होती. दि. 22 मे 2024 रोजी वृद्ध पुरूषोत्तम पुट्टेवार यांचा एका ‘हिट-अँड-रन’ अपघातात मृत्यू झाल्याचे सुरुवातीला नोंदवले गेले होते.
त्यांच्या मुलाने, मनीष पुट्टेवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा अपघात झाला आणि त्यांना रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.
तपासादरम्यान, पोलिसांना या अपघातावर संशय आला आणि गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. तपासात हा अपघात नसून, आरोपी अर्चना पुट्टेवार हिने सासरच्या मालमत्तेच्या वादातून सासऱ्याची हत्या करण्याचा कट रचल्याचे उघड झाले.
आरोपी महिलेने मारेकऱ्यांना सुपारी देत, अपघात भासवण्यासाठी एक कोटी खर्च केले. या हत्याकांडात अर्चना पुट्टेवारचा भाऊ प्रशांत पार्लेवार हासुद्धा आरोपी आहे.