
“सावनेरच्या दुय्यम निबंधक कार्यालयात लाच घेतल्याशिवाय कामे होत नाही”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
दिलीप चव्हाण, नागपुर
राज्य शासनाकडून राज्यात चांगला कारभार होत असल्याचा दावा होतो. विविध खात्याचे मंत्री आकडेवारी दाखवत त्यांचे खाते सर्वोत्कृष्ठ काम करत असल्याचे दाखले देतात. परंतु राज्याचे महसूलमंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे स्वत: नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथील एका दुय्यम निबंधक कार्यालयात अचानक पोहचले. येथील कारभार बघून तेही थक्का झाले.
येथे नेमके काय झाले? त्याबाबत आपण जाणून घेऊ या.
नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा परिसरात बुधवारी कापसाला खत देत असताना वीज कोसळली. यात आई आणि मुलासह शेजारी काम करणाऱ्या मजूर महिलेचा देखील मृत्यू झाला. वंदना प्रकाश पाटील (४२), ओम प्रकाश पाटील (२२) व निर्मल रामचंद्र पराते अशी मृतांची नावे आहेत.
या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी पालकमंत्री गुरूवारी स्वत: गेले होते. तेथे कुटुंबियांची भेट घेऊन परतीच्या वेळी ते सावनेरच्या दुय्यम निबंधक कार्यालयात अचानक पोहचले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना बघून अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली.
दरम्यान या कार्यालयात हजारो तक्रारी प्रलंबित असल्याच्या तक्रारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे येत होत्या. सदर कार्यालयाला भेट देताच येथील भोंगळ कारभाराचे प्रात्याक्षीक स्वत: चंद्रशेखर बावनकुळे यांनी बघितले. येथे भेटी दरम्यान महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे खूद्द नागरिकांकडून तक्रारींचा पाढा वाचला.
या कार्यालयात पैसे घेतल्याशिवाय काम होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. यावेळी सावनेर दुय्यम निबंधक कार्यालयात दुय्यम निबंधक अधिकारीही गैरहजर होते. पालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांबाबत विचारना केल्यावर उडवा- उडवीची उत्तरे दिली जात होती. पालकमंत्र्यांना या कायार्लयात अनेक आवश्यक दस्तावेज संदर्भातील रजिस्टर मेंटेन केले जात नसल्याचाही धक्कादायक प्रकार निदर्शात आला.
त्याबाबत पालकमंत्र्यांनी येथील उपस्थितांकडून जाबही विचारला. त्यानंतर उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धारेवर धरले. या घटनेमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जिल्हा असलेल्या नागपुरातील दुय्यम उपनिबंधक कार्यालयातील कामांवर पून्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
राज्यातील इतरही भागातील या कार्यालयांतील स्थिती सारखी असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहे. त्यामुळे येथील कामात सुधारणा करण्याचे आवाहन पालकमंत्री बावनकुळे कसे घेणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
पालकमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
सावनेरमधील दुय्यम निबंधक कार्यालयातील भोंगड कारभार बघून महसूलमंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे थक्कच झाले. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले. येथे नागरिकांची गैरसोय खपवून घेणार नसल्याचेही त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले.