
“भरती प्रक्रियेत आर्थिक व्यवहार”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
ज्ञानेश्वर चव्हाण, जालना
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात अंगणवाडी भरती प्रक्रियेत आर्थिक व्यवहार केल्याच्या कारणावरून घनसावंगी येथील बालविकास प्रकल्प अधिकारी विनोद डाबेराव यांना निलंबित करण्यात आले आहे.
नुकत्याच झालेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांच्या अर्जाच्या पडताळणीमध्ये अक्षम्य दुर्लक्ष करून कर्तव्यात कसूर करणे, प्राथमिक गुणवत्ता यादीवर उमेदवारांनी घेतलेल्या आक्षेपांच्या अनुषंगाने घेतलेल्या सुनावणीचा निर्णय संबंधित उमेदवारांना देणे अपेक्षित असताना व उमेदवारांनी माहिती अधिकारांमध्ये सुनावणी निर्णयाची माहिती मागितली असताना सुनावणी निर्णय तक्रारदारास उपलब्ध करून न देणे.
कार्यालयामध्ये कनिष्ठ सहाय्यक कार्यरत असताना सदर भरती प्रक्रियेमध्ये स्वतःच्या संमतीने इतर अंगणवाडी सेविका यांना हस्तक्षेप करायला लावणे.
तसेच भरती प्रक्रियेची गोपनीय माहिती भरतीशी संबंधित असलेल्या उमेदवारांना संपर्क करून जाहीर करणे. या आरोपांसोबतच भरती प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर फिरल्यानंतर त्याची दखल घेऊन तसेच भरती प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याच्या आठ उमेदवारांच्या तक्रारीची शहानिशा करून शासनाने हा निर्णय घेतला आहे.
विनोद डाबेराव यांच्या संदर्भात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप आणि आठ तक्रारदारांचे तक्रार अर्ज याची शहानिशा करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती.
या समितीचा अहवाल आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल विकास विभागाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना यांच्या स्वाक्षरीने हा अहवाल एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्तांना दिनांक एक जुलै रोजी पाठविण्यात आला होता.
त्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या आदेशाने महाराष्ट्र शासनाचे सहसचिव वी.रा. ठाकूर यांनी घनसावंगी येथील बालविकास प्रकल्प अधिकारी विनोद डाबेराव यांना निलंबित केल्याचे आदेश दिनांक 10 जुलै रोजी काढले आहेत.