
“अनिल अंबानींच्या मुंबईतील मालमत्तांवर CBI चे छापे”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
दिलीप चव्हाण, मुंबई
17,000 कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीच्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे CBI ने शनिवारी सकाळी उद्योगपती अनिल अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानी छापे टाकले.या ईडीच्या छाप्या नंतर आता दिल्लीच्या सीबीआय टीम कारवाईसाठी मुंबईत दाखल झाली आहे.
दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानींचे धाकटे भाऊ अनिल अंबानींच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाही. अलीकडेच अनिल अंबानींच्या मुंबईतील ठिकाणांवर ईडीने छापेमारी केली होती तर, आता ईडीनंतर अनिल अंबानी CBI च्या रडारवर आले आहेत.
मोठ्या प्रमाणात बँक फसवणुकीच्या संशयास्पद प्रकरणात रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि अनिल अंबानी यांच्याशी संबंधित ठिकाणांवर सीबीआयने छापे टाकले आणि त्यानंतर FIR दाखल करण्यात आली आहे.
तब्बल 17000 कोटी रुपयांपेक्षा जास्त बँक कर्ज घोटाळ्यांशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाबाबत ईडीने काही दिवसांआधीच अंबानींची चौकशी केल्यानंतर CBI कडून ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात एका कथित फसवणुकीचा समावेश आहे ज्यामुळे स्टेट बँकेला 2000 कोटी रुपयांचे नुकसान झाले.
वृत्तसंस्था पीटीआयने सूत्रांचा हवाला देत म्हटले की अंबानी यांनी कागदपत्रे सादर करण्यासाठी 10 दिवसांची मुदत मागितली होती, पण तपासकर्त्यांना अद्याप खात्री पटलेली नाही. ईडीला येस बँकेने दिलेल्या कर्जांमध्ये अनियमितता असल्याची शक्यता आहे.
शनिवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास अधिकारी कफ परेड येथील सीविंड येथील अंबानी यांच्या निवासस्थानी पोहोचले. सूत्रांच्या माहितीनुसार, ‘सात ते आठ अधिकारी’ त्यांच्या ठिकाणी पोहोचले आणि तेव्हापासून शोध घेत आहेत.
त्याचवेळी, सीबीआयच्या तपासादरम्यान अनिल अंबानी आणि त्यांचे कुटुंब निवासस्थानी उपस्थित असल्याचंही माहिती आहे. दि. 4 ऑगस्ट रोजी ED ने अनिल अंबानी यांच्या कंपन्यांशी संबंधित 17 हजार कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याच्या प्रकरणाचा तपास वाढवला होता तर, अंबानींना समन्स बजावल्यानंतर काही दिवसांनी एजन्सीने त्यांच्या अनेक उच्च अधिकाऱ्यांना PMLA अंतर्गत चौकशीसाठी समन्स बजावले.