
“योगेश कुंभेजकर वाशिमचे नवे जिल्हाधिकारी”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
दिलीप चव्हाण, वाशिम
गेल्या अनेक आठवड्यांपासून सुरू असलेली सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांची परंपरा या आठवड्यातही सुरूच राहिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला आहे
परभणी, वाशिम आणि अकोल्याचे जिल्हाधिकारी बदलण्यात आले असून, योगेश कुंभेजकर यांची वाशिमच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारनं पाच भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्या जाहीर केल्या.
योगेश कुंभेजकर (2016 बॅच) यांची वाशिमच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी कुंभेजकर हे अकोला येथे व्यवस्थापकीय संचालकपदी (महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ) कार्यरत होते. त्यांच्या अनुभवामुळे वाशिमच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा आहे. त्यांनी शेती आणि प्रशासकीय क्षेत्रात केलेल्या कामामुळे त्यांना ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली.
तर वाशिमच्या जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस. यांची महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महा बियाणे), अकोला येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडून राज्यातील शेतीसाठी बियाणे वितरणाच्या कामाला गती मिळेल, अशी अपेक्षा आहे. तर 2011 च्या बॅचचे रघुनाथ गावडे यांची मुंबईतील अतिरिक्त मुद्रांक शुल्क नियंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
अतिरिक्त नियंत्रक (मुद्रांक, मुंबई) संजय चव्हाण (2011 बॅच) यांची परभणीचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वर्षा मीणा यांची अकोलाच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.