
“नागपूर-पुणे वंदे भारत 2 तास खोळंबली”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
दिलीप चव्हाण, अकोला
देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत एक्सप्रेस म्हणून गेल्याच आठवड्यात सुरू झालेल्या नागपूर-पुणे वंदे भारतला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तब्बल 12 तास प्रवास करणारी ही एक्सप्रेस पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाला गतीमान पद्धतीने जोडत आहे.
नागपूरहून अकोलाकडे जाणाऱ्या धावत्या मालवाहू रेल्वे गाडीचे डब्बे निसटले. मालगाडीचे कपलिंग अचानक तुटल्याने ही घटना घडली होती. मात्र, वेळीच हा प्रसंग लक्षात आल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला.
अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू रेल्वे स्टेशनच्या काही अंतरावर पोल क्रमांक ५९९/११ ते ५९९/१२ नजीक धावत्या मालगाडीचे डब्बे निसटले होते. दरम्यान रेल्वे पायलटने प्रसंगावध राखत धावत्या रेल्वेचा वेग नियंत्रित केला.
दरम्यान, नागपूरवरुन भुसावळ, मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर काही काळासाठी परिणाम झाला आहे. त्यामध्ये, वंदे भारत एक्सप्रेसलाही याचा फटका बसला. ज्या स्थानकावर वंदे भारतला थांबा नाही,त्या मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस तब्बल 2 तास थांबली होती. दरम्यान, अजनी (नागपूर) ते पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला वर्धा, बडनेरा, अकोला जंक्शन, शेगांव, भुसावळ, जळगाव,मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड कॉर्डलाईन हे थांबे आहेत.
वंदे भारतच्या या खोळंब्यामुळे पुण्यासह मुंबईकडं जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर देखील काही काळ परिणाम झाला होता. अजनी ते पुणे दरम्यान धावणारी ही वंदे भारत ट्रेन महाराष्ट्रासाठी मिळालेली 12 वी वंदे भारत आहे.