
“अंगणवाडी सेविकांनी लाडकी बहिण योजनेच्या फेरतपासणीच्या कामास विरोध दर्शविला”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
ज्ञानेश्वर चव्हाण, अमरावती
लाडकी बहिण योजनेच्या फेरतपासणीच्या कामास अंगणवाडी सेविकांनी विरोध दर्शविला आहे. याशिवाय शासनाने लागू केलेल्या ‘फेस रिडींग’पद्धतीला विरोध दर्शवितानाच विद्यार्थ्यांच्या दुपारच्या भोजनासाठी पुरवले जाणार रेशन गुणवत्तापूर्ण असावे, अशी मागणी केली आहे.
आयटकशी संलग्न म. रा. अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांच्या नेतृत्वात आज, मंगळवारी अंगणवाडी सेविकांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे डेप्युटी सीइओ यांची भेट घेतली.
या दोन्ही अधिकाऱ्यांना निवेदन देत सदर मागण्यांसाठी त्यांना साकडे घालण्यात आले. शासनाने अलिकडेच लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांची फेरतपासणी सुरु केली आहे.
चारचाकी वाहनधारक, २१ वर्षांच्या आतील व ६५ वर्षांवरील महिला, एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक लाभार्थी, योजनेचा अर्ज भरताना अविवाहित परंतु आता विवाहित अशा लाभार्थ्यांची पडताळणी या फेरतपासणीतून केली जात आहे.
मुळात अर्ज भरुन घेतानाही अंगणवाडी सेविकांची मदत घेण्यात आली होती. त्यावेळी त्यांना मेहनताना देण्यात येईल, हेही सांगण्यात आले होते. परंतु बहुतेक अंगणवाडी सेविकांना अद्यापही मोबदला मिळाला नसल्याच्या तक्रारी आहे.
शिवाय अंगणवाडी सेविकांकडे आधीच अनेक कामे सोपविण्यात आली असल्याने हे अतिरिक्त काम केव्हा करायचे, असा त्यांचा सवाल आहे. हे सर्व मुद्दे यावेळी संबंधित अधिकाऱ्यांपुढे मांडण्यात आले.
त्याचवेळी फेस रिडींग ही नवी पद्धत रद्द करुन बालकांसाठी पुरवला जाणारा आहार (टीएचआर) गुणवत्तापूर्ण असावा, अशीही मागणी रेटण्यात आली. यावेळी महेश जाधव यांच्याशिवाय जिल्ह्यातील इतर पदाधिकारी महिलाही उपस्थित होत्या.