
“दारव्हा शहरात ४ बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
दिलीप चव्हाण, यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा शहरात जुने रेल्वे स्टेशन परिसरात वर्धा-नांदेड रेल्वेचे उड्डाण पुलासाठी खोदकाम करण्यात आले होते. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. खोदलेल्या खड्डयात चार मुले बुडाल्याची धक्कादायक घटना सायंकाळी घडल्याने खळबळ उडाली आहे. ही मुले तेथे नेमकी कशासाठी गेली होती हे कळलेले नाही.
या पाण्यात पडल्याने चार मुलांना नाका तोंडात ते पाणी गेले. स्थानिकांनी या मुलांना कसे तरी बाहेर काढले. त्यानंतर त्यांना प्रथमोपचार देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र मुलांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने यवतमाळ येथे हलविण्यात आले. या मुलांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
या मुलांची नावे रीहान असलम खान (१३) गोलु पांडुरंग नारनवरे (१०) सोम्या सतीश खडसन (१०) वैभव आशीष बोधले (१४) अशी आहेत. ही सर्व मुले दारव्हा रेल्वे स्टेशन परिसरातील राहणारी असून या मोठ्या दुर्घटनेने परिसरात रेल्वे आणि प्रशासनाविरोधात रोष व्यक्त होत आहे.
परिसरात तणाव आणि हळहळ
या घटनेची माहिती शहरात पसरताच रुग्णालय परिसरात नागरिकांची मोठी गर्दी केली. त्यामुळे येथे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तणाव निवळण्यासाठी प्रयत्न केला. या चारही मुलांवर प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने ऑक्सिजन लावून त्यांना यवतमाळला हलवण्यात आले होते.
दोन रुग्णवाहिकेद्वारे या चारही मुलांचे मृतदेह यवतमाळ येथून दारव्हा येथील उपजिल्हा रुग्णालयात रात्री ९ वाजताच्या सुमारास आणण्यात आले. त्यावेळी नागरिकांनी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली होती.