
“महावितरणचा सहाय्यक अभियंता यांना २९ हजारांची लाच घेताना अटक”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
दिलीप चव्हाण, जळगाव
सौरऊर्जा प्रकल्पांच्या रिलीज ऑर्डरसाठी २९ हजार रुपयांची लाच घेताना पाचोरा-२ उपविभागातील महावितरणचे सहाय्यक अभियंता मनोज जगन्नाथ मोरे (वय ३८) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि. १२) त्यांच्या कार्यालयात करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे सोलर फिटिंग व्यवसायात असून, त्यांनी तीन नवीन प्रकरणांची कागदपत्रे ऑनलाईन सबमिट केली होती. या तीन प्रकरणांच्या रिलीज ऑर्डरसाठी मोरे यांनी प्रत्येकी ३,००० रुपये दराने एकूण ९,००० रुपयांची मागणी केली
याशिवाय, यापूर्वी तक्रारदारांची एकूण २८ प्रकरणांची रिलीज ऑर्डर काढून दिल्याचे कारण देत, प्रत्येकी २,५०० रुपये दराने ७०,००० रुपयांची मागणी करण्यात आली होती.
त्यापैकी तक्रारदारांनी आधीच ३०,००० रुपये दिले होते. उर्वरित ४०,००० पैकी पहिल्या हप्त्याचे २०,००० रुपये आणि सध्याच्या तीन प्रकरणांसाठीचे ९,००० रुपये, अशा एकूण २९,००० रुपयांची मागणी मोरे यांनी केली होती.
तक्रारदारांनी ACB कडे तक्रार दाखल केल्यानंतर, नियोजित सापळा रचून आज मोरे यांनी स्वतः लाचेची रक्कम स्वीकारली. त्यानंतर त्यांना ACB पथकाने ताब्यात घेतले असून पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, राकेश दुसाने, अमोल सूर्यवंशी, प्रणेश ठाकूर आणि चालक सुरेश पाटील यांच्या पथकाने केली.