
“बारमध्ये फायलींवर स्वाक्षऱ्या करणारे 24 तासात गवसले”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
ज्ञानेश्वर चव्हाण, नागपूर
नागपूर येथील मनीषनगर भागातील एका बारमध्ये तीन व्यक्ती महाराष्ट्र शासन असे लिहिलेल्या फाईल्सचा गठ्ठा घेऊन बसले होते. त्यापैकी एक त्या फायलीवर स्वाक्षरी करत होता. यामुळे राज्यात खळबळ उडाली होती. दि. २८ जुलैला या संदर्भातील चित्रफीत समाज माध्यम व माध्यमांवर सार्वत्रिक झाली होती. तत्पूर्वी मंगळवारी दिवसभर तो कर्मचारी कोण याबाबत उत्सूकता शिगेला पोहोचली होती. वर्धा येथे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत विभागीय आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले होते.
सोमवारी हे प्रकरण पुढे आल्यानंतर २४ तासाच्या आत त्या मद्यपी अधिकाऱ्याचा शोध लावण्यात प्रशासनाला यश आले. बारमधील सीसीटीव्हीवरुन या अधिकाऱ्याचा शोध घेतला असता मद्याचा घोट घेत स्वाक्षरी करणारे अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चामोर्शी उपविभागातील देवानंद सोनटक्के असल्याचे निष्पन्न झाले. दि.२९ जुलैला तडकाफडकी त्यांना निलंबन करण्यात आले.
गडचिरोलीच्या अधीक्षक अभियंता नीता ठाकरे यांनी या कारवाईला दुजोरा दिला. दरम्यान, जिल्ह्यात सार्वजनिक बांधकामच्या अखत्यारित रस्त्यांच्या कामांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर असताना अधिकाऱ्याने बारमध्ये बसून स्वाक्षऱ्या केल्याचे प्रकरण समोर आल्याने तीव्र रोष व्यक्त होत आहे. सदर प्रकरणामुळे सोनटक्के आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतरांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. हे अधिकारी यापूर्वीही एका प्रकरणात वादग्रस्त ठरले होते.