
“एकाच बाईचे 8 नवरे, ‘लुटेरी दुल्हन’ ने केली फसवणूक”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
दिलीप चव्हाण, नागपुर
लुटेरी दुल्हन’ हा प्रकार उत्तर भारतात घडल्याचं आपण ऐकलं असेल. त्यावर चित्रपट सुध्दा तयार झालेत. त्यांची कशी फसवणूक केली याबद्दलची माहिती त्यांनी कोर्टात सादर केली आहे. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शारदा भोपाले यांनी दिलेल्या माहितीनुसार, समीरा फातिमा असं या ‘लुटेरी दुल्हन’चं नाव असून ती एम. ए. (इंग्लिश) बीएड आहे. तसेच ती मोमिनपुरा इथल्या ऊर्दू शाळेत शिक्षिका देखील आहे. तिचं पहिलं लग्न भिवंडीमध्ये झालं होतं.
तिच्यावर नागपुरातील तीन पोलीस ठाण्यासह छत्रपती संभाजीनगर, मुंबई, पवनी अशा पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. तिच्या पहिल्या नवऱ्यापासून ते आठव्या नवऱ्यापर्यंत सगळ्यांनी एकत्र येत कोर्टात एक शपथपत्र देखील दाखल केलं आहे.
गिट्टीदान पोलीस ठाण्यात २०२४ मध्ये नागपुरातील गुलाम गौस पठाण यांनी तक्रार दिली होती की त्यांची समीरा फातिमा या महिलेनं फसवणूक केली आहे. त्यांची ओळख फेसबुकवरून झाली होती. ‘माझा घटस्फोट झाला आहे, मी आता दुसऱ्या लग्नाचा विचार करत आहे,’ असं तिनं सांगितलं. त्यानंतर दोघांमध्ये भेटीगाठी वाढल्या. ते रात्रंदिवस फोनवर बोलायला लागले. त्यानंतर समीरानं अश्लील व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्यांच्यावर लग्नासाठी दबाव आणला. दोघांनी लग्न केलं. पण, लग्न झाल्यानंतरही व्हीडिओची धमकी दिली, तसेच इतर कारणांसाठी सुद्धा लाखो रुपयांची मागणी होत होती. पैसे दिले नाही तर आपल्या लोकांना बोलावून दहशत निर्माण करायची. त्यामुळे गुलाम पठाण समीरापासून दूर राहू लागले.
इतक्यात त्यांना माहिती झालं की या महिलेची आधीच काही लग्न झालेली आहेत. त्यांच्या आधीच्या नवऱ्यापासून घटस्फोट घ्यायच्या आधीच तिनं गुलाम यांच्यासोबत लग्न केलं होतं. त्या महिलेनं त्यांना तलाकनामा देखील चुकीचा दाखवला होता. त्यांच्याकडून वेगवेगळ्या कारणानं तिनं लाखो रुपये घेतले होते. गुलाम यांच्या तक्रारीनुसार गिट्टीखदान पोलीस समीराचा शोध घेत होते.
काही महिन्यांपूर्वी तिला अटक करण्यासाठी गेले तेव्हा ती गर्भवती होती.त्यामुळे पोलिसांनी तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केलं. पण,ती परस्पर खासगी रुग्णालयात गेली. पोलिसांनी नोटीस देऊनही ती हजर झाली नाही. त्यानंतर आता पोलिसांनी सापळा रचून तिला अटक केली आहे.
कशी आहे मोडस ऑपरेंडी?
समीरानं फक्त गौस यांच्यासोबतच लग्न करून फसवणूक केली असं नाहीतर तिनं आणखी चार-पाच लग्न केल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं. पण हे प्रकरण कोर्टात गेलं तेव्हा तिचे आठ नवरे समोर आले. त्यांनी कोर्टात हजर राहून शपथपत्र दाखल केलं. याबद्दल या आठही नवऱ्यांनी आपल्या वकिलांसोबत पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
सध्या दाखल असलेल्या तक्रारीनुसार, तिनं २०१७ पासून लग्न करून फसवणूक करायला सुरुवात केली होती. पहिल्या पतीसोबत घटस्फोट न घेता मॅट्रीमोनिअल वेबसाईट किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून मुस्लीम समाजातील श्रीमंत घटस्फोटीत पुरुषांना हेरायचं आणि त्यांच्यासोबत ओळख वाढवायची. ‘मी पण घटस्फोटीत असून मी नवऱ्याच्या शोधात आहे,’ असं सांगायचं. त्यानंतर खोटा तलाकनामा दाखवून त्यांच्यासोबत लग्न करायचं.
पुढच्या दोन-तीन महिन्यात त्यांच्याकडून पैसे लुटायचे, त्यांना व्हीडिओ, खोट्या तक्रारीच्या धमक्या द्यायच्या आणि आणखी पैसे लुटायचे पैसे दिले नाही तर आपले लोक बोलावून त्यांना मारहाण करायची. त्यांच्यामध्ये दहशत निर्माण करायची. त्याच्याकडून पैसे लुटल्यानंतर, भांडण झाल्यानंतर आणखी दुसऱ्याला पकडायचं आणि त्याच्यासोबतही तेच करायचं, अशी तिची कार्यपद्धती होती. आतापर्यंत तिनं अशाप्रकारे लाखो रुपये लुटले आहेत. ही तिची मोडस ऑपरेंडी असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.यामध्ये एका नामांकित बँकेत मॅनेजर पदावर नोकरीवर असलेल्या व्यक्तीचा देखील समावेश आहे
ती व्यक्ती मूळची छत्रपती संभाजीनगरची असून नागपुरात नोकरीनिमित्त राहते. त्यांच्यासोबतही समीराची फेसबुकवरून ओळख झाली होती. हे आठ नवरे फक्त रेकॉर्डवर समोर आलेले आहेत. पण, अजूनही बरेच लोक आहेत जे समोर यायला तयार नाहीत, अशीही माहिती पोलिसांनी दिली.
कोर्टानं तिची तुरुंगात रवानगी केली असून आपलं प्रत्येक नवऱ्यासोबत भांडण व्हायचं त्यामुळे मी फक्त सहा लग्नं केली आहेत, असं तिनं पोलिसांना सांगितलं आहे. कोर्टानं तिला घटस्फोट झाल्याचे कागदपत्र मागितले, पण, ती देऊ शकली नाही. तसेच निकाहनामा सुद्धा तिच्या म्हणण्यानुसारच तयार केलेले होते.
कारण, हे सगळे निकाह तिच्या घरी मुस्लीम धर्माच्या रितीरिवाजानुसार झाले होते. मुलासाठी जामीन देण्यात यावा अशी मागणी आरोपीच्यावतीनं करण्यात आली. पण, कोर्टानं तिच्या मुलाचा ताबा तिच्या शेवटच्या पतीला दिला असून तिची रवानगी तुरुंगात केली आहे, अशी माहिती तक्रारदारांच्या वकील ॲड. फातिमा पठाण यांनी दिली. दरम्यान प्रसार माध्यमांनी आरोपीच्या वकिलांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, तो होऊ शकला नाही.