
“महाराष्ट्रात २० कोटी २० लाख रूपयांची टॅक्स चोरी”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
दिलीप चव्हाण, मुंबई
मेसर्स सूर्या एंटरप्रायजेस ही व्यापार संस्था दि. ८ सप्टेंबर, २०२१ रोजी वस्तू आणि सेवा कर कायद्यान्वये नोंदणीकृत झाली असून संबंधित व्यक्तीने कोणतीही वस्तू अथवा सेवा प्रत्यक्षात न प्राप्त करता, तसेच कोणत्याही वस्तूंची देवाण-घेवाण न करता, एकूण २०.२० कोटी रुपयांच्या बनावट इनपूट टॅक्स क्रेडिट (ITC) फसवणूक करणाऱ्या पद्धतीने बनावट बीजकांच्या आधारे ITC प्राप्त केल्याचे निदर्शनास आले आहे.
महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा कर विभागामार्फत मेसर्स सूर्या एंटरप्रायजेस या व्यापार संस्थेविरोधात तपास सुरू केला.या प्रकरणात संस्थेचे मालक निखिल नरेश वालेचा (वय २८ वर्षे) यास अटक करण्यात आली. तपासादरम्यान व्यापाराच्या नोंदणीकृत पत्त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी भेट दिल्यानंतर असे आढळून आले की, आरोपीने १७.०३ कोटी रुपयांचे बनावट ITC अस्तित्वात नसलेल्या संस्थांच्या माध्यमातून प्राप्त केले असून ३.०३ कोटी रुपयांचे अतिरिक्त ITC चुकीच्या पद्धतीने GST विवरणपत्रांमध्ये दाखविण्यात आले होते. या व्यवहारांसाठी कोणतीही वस्तू अथवा सेवा प्रत्यक्षात प्राप्त झालेली नव्हती.
प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, उल्हासनगर यांनी निखिल वालेचा याला ३० जुलै २०२५ पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. बेकायदेशीरपणे ITC मिळविणे अथवा हस्तांतरित करणे राज्य वस्तू व सेवा कर विभागामार्फत बनावट बीजक व खोट्या व्यवहारांद्वारे केली जाणारी करचोरी यांच्यावर नियंत्रण ठेवण्याच्या अनुषंगाने सुरू करण्यात आलेल्या विशेष तपास मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. या कारवाई राज्यकर सहायक आयुक्त संतोष लोंढे, कर अधिकारी दीप्ती पिलारे, सुजीत कक्कड, संतोष खेडकर तसेच निरीक्षक व कर सहाय्यक यांच्या विशेष पथकाच्या मदतीने करण्यात आली.