
“शिधावाटप अधिकाऱ्याला २० हजारांची लाच घेताना अटक”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
दिलीप चव्हाण, मुंबई
घाटकोपर, कांदिवली येथील शिधावाटप दुकानातील व्यवस्थापकाकडून २० हजार रुपयांची लाच घेताना शिधावाटप तपासणी अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.
सचिन बळीराम आत्राम असे अटकेतील अधिकाऱ्याचे नाव असून, तो ग परिमंडळ, शिधावाटप कार्यालय, कांदिवली येथे कार्यरत होता. फिर्यादी हे कांदिवलीतील एका शिधावाटप दुकानात मॅनेजर आहेत.
त्यांच्या दुकानात शिधा (तांदूळ) उतरवण्यास ट्रक आला असताना, तपासणी अधिकारी सचिन आत्राम तेथे पोहोचले. त्यांनी गाडीचा जीपीएस बंद का आहे आणि निरीक्षकाच्या अनुपस्थितीत माल का उतरवला, असा जाब विचारला. यानंतर त्यांनी तक्रारदार व ड्रायव्हरचा जबाब घेतला आणि ‘तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, तो टाळायचा असेल तर २० हजार रुपये द्या,’ अशी मागणी केली. ही रक्कम स्वतःसाठी आणि डेप्युटी कंट्रोलर यांच्यासाठी असल्याचे त्याने स्पष्ट म्हटले.
तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत २५ ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई येथे तक्रार दाखल केली. त्यानंतर विभागाने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर सापळा रचून सचिन आत्राम याला २० हजार रुपये घेताना रंगेहाथ अटक केली. त्याच्यावर लाचप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अपर पोलिस आयुक्त संदीप दिवाण, अपर पोलिस उपआयुक्त अनिल घेरडीकर व राजेंद्र सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नितीन थोरात, सहाय्यक पोलिस निरीक्षक हरिदास किल्लेदार यांनी तपास केला.





