
“पनवेलमध्ये पोलीस उपनिरीक्षकाला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
दिलीप चव्हाण, मुंबई
नवी मुंबईच्या पनवेल शहर पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक सचिन वामन वाईकर यांना लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. सार्वजनिक पदावर असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याकडून असा प्रकार घडणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे.
५० हजार रुपयांची लाच ते स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहाथ अटक केली आहे. लाच घेण्याच्या या प्रकारात वाईकर यांच्यासह रविंद्र उर्फ सचिन सुभाष बुट्टे या खाजगी इसमालाही पोलिसांनी अटक केली आहे. तक्रादाराच्या (वय ३२) यांच्या वडिलांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये कलम वाढवण्याची तसेच जामिन नाकारून अटक करण्याची धमकी उपनिरीक्षक वाईकर यानी दिली होती.
ही कारवाई टाळण्यासाठी त्यांनी १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र, नंतर तडजोडी अंती ५०,००० रुपयांमध्ये हा व्यवहार निश्चित करण्यात आला होता. याबाबत तक्रारदाराने हा प्रकार थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रारीद्वारे कळवला होता. त्यानंतर लगेचच पथकाने सापळ्याचे नियोजन केले. दि. २१ जुलै २०२५ रोजी रात्री १०.३० वाजता, पनवेलमधील श्री. मारुती कुशनजवळ, शिवाजी चौक, जुना पनवेल येथे पोलीस उपनिरीक्षक वाईकर यांनी लाच रक्कम त्यांच्या व्हॅगन आर कारमध्ये खाजगी इसम रविंद्र बुट्टे यांच्यामार्फत स्वीकारली होती.
लाचलुचपत विभागाने (ACB) सापळा रचुत दोघांनाही रंगेहाथ अटक केली. या लाच प्रकरणी दोघांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे पोलीस यंत्रणेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे. ACB च्या यशस्वी कारवाईमुळे पनवेल शहर आणि पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.
लाचखोरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अशा कारवायांनी इशारा मिळतो, अशी प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहे. लाचलुचपत विभाग रायगडच्या पोलीस उपअधीक्षक सरिता भोसले, पोलीस निरीक्षक निशांत धनवडे, सहाय्यक फौजदार विनोद जाधव, पोलीस हवालदार महेश पाटील, पोलीस शिपाई नवोदित नांदगावकर यांनी ही कारवाई केली.