
“कळंबोलीतील न्यू अजवा फॅमिली रेस्टॉरंटवर छापा”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
दिलीप चव्हाण, नवी मुंबई
कळंबोलीतील न्यू अजवा फॅमिली रेस्टॉरंटमध्ये वीज चोरी होत असल्याची माहिती ‘महावितरण’च्या अधिकार्यांना मिळाली होती. वाशी येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता शशांक पानतावणे, वरिष्ठ तंत्रज्ञ विजय पाटील आणि पनवेल भरारी पथकाचे वरिष्ठ तंत्रज्ञ मुकुंद चितळे आदिच्या पथकाने न्यू अजवा रेस्टॉरंटवर छापा मारला.
भरारी पथकाने तेथील मीटरची तपासणी केली असता, मीटरची बॉडी संशयास्पद स्थितीत असल्याचे आढळून आले. या हॉटेल चालकाने ‘महावितरण’च्या विद्युत मीटरमध्ये छेडछाड करुन आर फेज सीटीला छिद्र पाडून मीटरमध्ये होणार्या विजेचे मापन होऊ न देता मागील वर्भभरा पासून वीजचोरी केल्याचे तपासणीत आढळून आले आहे.
सदर रेस्टॉरंटने मागील वर्षभरामध्ये एकूण ४१,५७० युनिटस्ची एकूण ०९ लाख ४८ हजार २५० रुपयांची वीजचोरी केल्याचे ’महावितरण’च्या भरारी पथकाने केलेल्या तपासणीत आढळून आले. यापूर्वी सुध्दा ‘महावितरण’ने नोव्हेंबर २०२३ मध्ये याच हॉटेल चालकावर वीजचोरी केल्याप्रकरणी कारवाई केली होती.
भरारी पथकाने या वीजचोरी प्रकरणात सदर रेस्टॉरंट चालक फवझान तल्हा बलवा याच्या विरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याच्यावर पुढील कारवाई सुरु केली आहे.