
“कर्जबाजारीपणामुळे शेतकरी जगदीश बंजारा यांनी केली आत्महत्या”
महाराष्ट्र न्यूज लाईव्ह
ज्ञानेश्वर चव्हाण, धुळे
छाया बंजारा, जगदीश बंजारा यांच्या पत्नी अंदाजच नव्हता असं काही करणार ते. हिंमतवार होते ते. इतलं कर्ज बी झालं पण हिंमत होती. त्यांना तीन – तीन लेकरांवरती त्यांचा जीव होता, माझ्या वरही जीव होता परंतु त्यांनी, असं कसं काय केलं हे काही समजतच नाही.”
30 वर्षांच्या छाया बंजारा यांना पतीच्या जाण्याबाबत हे सांगताना रडू कोसळलं. छाया यांचे पती जगदीश बंजारा यांनी २४ सप्टेंबर रोजी आत्महत्या केल्याचं समोर आलं.
सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे धुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. जगदीश बंजारा यांनीही सततच्या नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याचं कुटुंबीय सांगतात.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
शिरपूर हा तालुका खरं तर जलसंधारणासाठीच्या ‘शिरपूर पॅटर्न’ या नावानेही ओळखला जातो. परंतु यंदा सप्टेंबरमध्ये झालेला पाऊस आणि त्यामुळं झालेलं नुकसान यामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचं चित्र आहे.
जगदीश बंजारा यांच्या भाटपुरा या गावात (मिडियाची टीम) आम्ही पोहचलो त्यावेळी झालेल्या घटनेमुळे गावात एकदम शांतता पसरली होती. छाया बंजारा यांच्यासोबत त्यांची तीन लहान मुलं होती. १३ वर्षांची मुलगी आणि १० आणि ८ वर्षांची दोन लहान मुलं.
४१ वर्षीय जगदीश बंजारा शेती करत होते. त्यांच्या शेतात कापूस आणि मक्याचं पीक होतं. स्वत:चं शेत त्यांनी गहाण ठेवलं होतं.
पण दुसऱ्याच्या शेतात काम करत होते आणि त्या पिकातूनच कमाईची अपेक्षा होती, असं त्यांच्या पत्नी छाया यांनी मिडियाच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितलं.
सततची नापिकी आणि गावातूनच अनेकांकडून उचललेलं लाखो रुपयांचं कर्ज याचाही तणाव माझ्या पतीवर होता असं त्या सांगत होत्या.
छाया बंजारा यांनी मिडियाशी बोलताना सांगितलं की, “या अतीपावसामुळे नुकसान झालं. दरसाल काही ना काही अडचण येतच होती. माल पिकत नव्हता. यामुळं त्यांनी आत्महत्या केली. थोडी दुसऱ्याची खेती केली होती. त्यात पिकलं होतं थोडसं. दोन्ही शेतं गहाण ठेवली आहेत. दुसऱ्याची शेती केली होती त्यात मका, तूर आहे.
त्यात नुकसान झालं.”त्या पुढे सांगतात की, “गावातच कोणाकडून एक लाख, कोणाकडून दोन लाख, एक लाख पन्नास हजार गावातच निघालं,” हे सांगताना त्यांना रडू आवरत नव्हतं. 30 वर्षीय छाया बंजारा यांना आता आपल्या तीन मुलांना मोठं कसं करायचं आणि डोक्यावर असलेलं कर्ज कसं फेडायचं? असा प्रश्न पडला आहे.





