
“वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर युवा प्रशिक्षणार्थ्यांचा मोर्चा धडकला”
महाराष्ट्र न्यूज लाईव्ह
अशोक रत्नपारखी, वाशिम
2 सप्टेंबर 2025 रोजी श्रीमती वैशाली पवार कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी यांनी आदेश पत्र काढून वाशिम जिल्ह्यातील युवा प्रशिक्षणार्थींना कार्यालयात येण्यास मज्जाव केला होता. या जणू जुलमी आदेशामुळे प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना मोठ्या दुविधेत टाकले गेले होते.
“कार्यालयात यायचे नाही, मग आम्ही आमच्या समस्या आणि प्रश्न कुठे मांडायचे?” असा प्रश्न युवा प्रशिक्षणार्थी यांच्या मनात निर्माण झाला होता. यासाठी प्रशिक्षणार्थी यांनी मोर्चा काढून आपली भूमिका मांडली.
यावर माननीय सहाय्यक आयुक्त प्रवीण खंडारे साहेब यांनी तात्काळ निर्णय घेत संबंधित आदेश रद्दबातल केले आणि नवीन पत्र जारी करून प्रशिक्षणार्थींचा मार्ग मोकळा केला. तसेच प्रशिक्षणार्थी यांच्या इतर समस्यांचेही निराकरण करण्यात आले. यामध्ये सर्वात महत्वाची मागणी म्हणजे उमेदवारांचे रखडलेले मानधन यावर सर्वसमावेशक चर्चा, ऑनलाईन स्वरूपात रीजॉइनिंग, प्रशिक्षणा नंतर कायम रोजगार उपलब्ध करुन द्यावा ह्याबाबत सविस्तर चर्चा करुन सकारात्मक दृष्टीकोनातून निर्णय घेण्यात आला.
या निर्णयामुळे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत वाशिम जिल्ह्यातील उमेदवारांना दिलासा मिळाला असून त्यांच्या समस्या सोडवण्याचा मार्ग प्रशासनाने सकारात्मक पद्धतीने खुला केला आहे.
या मोर्चात जिल्हा संघटनेचे अध्यक्ष नितीन चगदळ, संभाजीब्रिगेट विभागीय अध्यक्ष गजानन भोयर, संभाजीब्रिगेट जिल्हा अध्यक्ष गणेश सुर्वे, शेतकरी स्वाभिमानी संघटना युवक प्रदेशाध्यक्ष दामूअण्णा इंगोले, जिजाऊ ब्रिगेटच्या जिल्हा अध्यक्षा सौं आरु मॅडम, वाशिम करियर अकॅडमी संचालक पठाण सर युवा प्रशिक्षणार्थी जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल गंगावणे, जिल्हा सचिव प्रविण ढेंगळे, गणेश सावके, प्रदीप वानखडे, स्वाती भिमटे ह्याच्या नेतृत्वात युवा प्रशिक्षणार्थी यांनी भव्य मोर्चा काढून आपली भूमिका मांडली.
कौशल्य विभागाचा मनमानी कारभार यापुढे कदापि खपवून घेतल्या जाणार नाही. येत्या पाच दिवसांमध्ये जर मानधनाचा प्रश्न मार्गी लागल्यास नाही तर जिल्हा संघटनेच्या वतीने उग्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा नितीन चगदळ जिल्हाध्यक्ष मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना वाशिम यांनी दिला आहे.





