
“कारखेडा जिल्हा परिषदेच्या ज्ञान मंदिराच्या प्रवेशद्वारावर चिखल”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
अशोक रत्नपारखी, वाशिम
मानोरा तालुक्यातील कारखेडा ह्या गावामध्ये जिल्हा परिषदे द्वारा चालविल्या जात असलेल्या केंद्रीय प्राथमिक शाळेच्या प्रवेशद्वारावर मागील काही आठवड्यांपासून पाण्याचा प्रवाह वाहत असून या पाण्यामुळे प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणात चिखल झाल्याने सकाळ-संध्याकाळ शाळेत येणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना चिखल तुडवत शाळेत प्रवेश करावा लागत असल्याचे पुढे आले आहे.
शिक्षणासोबतच बालवयात विद्यार्थ्यांना नैतिकतेचे व स्वच्छतेचे धडे गुरुजनांकडून दिले जातात. व्यक्तिगत स्वच्छतेचे जीवन जगत असताना मोठे महत्त्व असल्याने स्वच्छता निकोप जीवन जगण्यासाठी फार महत्त्वाची सुद्धा असते. याचे शिक्षण सुद्धा शाळेतील शिक्षकांकडून दिल्या जात असल्यामुळे स्वच्छतेचे महत्त्व अधिकच वाढलेले असते.
कारखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळेत पहिली पासून तर पाचवी पर्यंत विद्यार्थी ज्ञानार्जन करतात. या शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर मात्र चिखल झालेला असल्यामुळे या चिखलातून शाळेत विद्यार्थ्यांना येणे-जाणे करावे लागते व शाळा सुटल्यावर सुद्धा चिखल तुडवतच घरी विद्यार्थ्यांना जावे लागत असल्याने विद्यार्थ्यांच्या बाल मनावर या चिखल व घाणीचा काय परिणाम पडेल असेल असा सवाल सुद्धा यानिमित्ताने पुढे येत आहे.





