
“अखेर सुर्यकांत मोरे निलंबित”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
दिलीपकुमार चव्हाण, पुणे
समितीच्या अहवालानंतर शासनाने पुण्यातील तत्कालीन जिल्हा अधीक्षक व सध्या उपसंचालक भूमी अभिलेख विभागाचे पुणे (एकत्रीकरण) सूर्यकांत मोरे यांना अखेर निलंबित केले आहे. भूमी अभिलेख विभागातील मोठा अधिकारी शासनाने निलंबित केल्याने खळबळ उडाली आहे.
त्यांच्या पुणे जिल्हा अधिक्षक पदावरील कार्यकाळात झालेला अनियमित कारभाराचा “पंचनामा” पुणे प्राईम न्यूजने वेळोवेळी प्रकाशित केला होता.
त्यामुळे महाराष्ट्र शासनाने त्यांना निलंबनाचा झटका देऊन भूमी अभिलेख मधील कारभार स्वच्छ ठेवण्याच्या दिशेने काही पावले उचलल्याचे बोलले जाते. शुक्रवारी 5 सप्टेंबरला सायंकाळी उशिरा मोरे यांच्या निलंबनाचा आदेश शासनाने जारी केला आहे.
काही महिन्यांपूर्वी मोजणी विभागाचा हवेली व पुणे जिल्हा कार्यालयाच्या अनियमित कारभाराचे वृत्तांकन काही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले होते.
त्यामुळे भूमी अभिलेख विभागातील भ्रष्टाचार समोर आल्याने शासनाने हवेली उपअधीक्षक कार्यालय व पुणे जिल्हा अधीक्षक कार्यालयाची तपासणी शासनाने नियुक्त केलेल्या समिती मार्फत केली होती.
यामध्ये हवेलीचे तत्कालीन उपअधिक्षक अमरसिंह पाटील यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. तसेच काही प्रकरणांमध्ये त्यांच्यावर पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल झाले होते.त्यामुळे त्यांची गांभीर्याने दखल घेत शासनाने पाटील यांना यापूर्वीच निलंबित केले होते.
हवेलीचे तत्कालीन उपअधिक्षक पाटील यांचे निलंबन झाल्यानंतर जिल्हा अधीक्षक सूर्यकांत मोरे यांच्यावर कारवाई होणार का ? याकडे नागरिकांचे लक्ष लागले होते. प्रसार माध्यमांमुळे प्रशासनावर दबाव निर्माण झाला असून, याच कामगिरीमुळे भूमी अभिलेख विभागातील भ्रष्टाचार उघडकीस आला आहे.
अखेर गंभीर अनियमित कारभाराची दखल शासनाने घेत सूर्यकांत मोरे यांना निलंबनाचा रस्ता दाखवला आहे. त्या अनुषंगाने त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, 1979 च्या नियम 8 अन्वये विभागीय चौकशीची कार्यवाही केली आहे.





