
“महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल कोकणात”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
ज्ञानेश्वर चव्हाण, सिंधुदुर्ग
मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाल्यानंतर हा पूल सर्वसामान्य नागरिक आणि पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील मालदिव म्हणजे पर्यटकांचे कोकण, तळ कोकणतील समुद्रकिनारी, बीचवर येणारे पर्यटक कोकण फिरण्याचा मनमुराद आनंद घेतात.
कोकणात आल्यानंतर समुद्रात बांधलेला सिंधुदुर्ग, मालवण किल्ला पाहण्याची मजाही काही औरच असते. तसेच, येथील विविध निसर्ग सौंदर्याची ठिकाणंही पर्यटक आवर्जून पाहतात. सिंधुदुर्ग जिल्ह्याला देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्रातून जिल्ह्यात प्रवेश करताना वैभववाडी तालुका हे जिल्ह्याचे प्रवेशद्वार आहे.
या जिल्ह्यात येणारा कोणताही पर्यटक नापणे धबधब्याला भेट दिल्याशिवाय पुढे जात नाही, असे म्हटले जाते. महाराष्ट्र राज्यातील पहिला काचेच पूल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नापणे धबधब्यावर उभारण्यात आला आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याहस्ते या पुलाचे उद्घाटन करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वैभववाडी येथील नापणे धबधब्यावर सिंधुरत्न योजनेतून हा पूल बांधण्यात आला असून या पुलामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे एक पर्यटन स्थळ निर्माण झाले असल्याचा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केलाय. लोकार्पणाच्या दिवशीय या पुलावर जाऊन निसर्ग सौंदर्य डोळे भरुन पाहण्याचा आनंद पर्यटक घेत आहेत. तर, या पुलाचे नयनरम्य दृश्य ड्रोनच्या माध्यमातून चित्रितही करण्यात आलंय. विराज ढवण यांनी हे ड्रोन शूट केलं आहे.
निसर्ग सौंदर्याचा अदभूद नमुना म्हणजे हा काचेचा पूल आहे. देशभरातून येणाऱ्या पर्यटकांवर मोहिनी घालणारा किंवा कोकणातील प्रसिद्ध सेल्फी पॉईंट म्हणून हा पूल पुढे नावारुपाला येईल, असे पर्यटका कडून बोलले जात आहे.