
“शेतकऱ्याने गमछा खांद्यावरून काढताच एसीबीची झडप”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
दिलीप चव्हाण, छत्रपती संभाजीनगर
शेतजमिनीचे वाटणीपत्र तयार करून देण्यासाठी १० हजारांची लाच मागणारा कोतवाल व तलाठी असे दाेघे एकाच वेळी एसीबीच्या सापळ्यात अडकले.
सोमवारी दुपारी पैठण तहसील कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत तलाठी अक्षय बबनराव बिनीवाले (३०) रा. म्हाडा कॉलनी, पैठण आणि कोतवाल सोमनाथ राघू कोल्हे (३६) रा.आपेगाव यांना अटक केली. तक्रारदाराची पैठण तालुक्यातील अगर नांदूर मध्ये गट क्रमांक ५८ मध्ये ५० आर सामायिक शेतजमीन आहे. त्यापैकी तक्रारदाराच्या नावे १६ आर जमीन आहे.दि.२५ जुलै रोजी त्यांनी जमिनीच्या वाटणीपत्रासाठी तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. त्याच्यावर नंतर काहीच कारवाई झाली नाही.
दि.१ ऑगस्ट रोजी तक्रारदाराने कोतवाल कोल्हे यांच्या कडे वाटणीपत्राच्या कामा बाबत विचारणा केली. तेव्हा वाटणीपत्र करून देण्यासाठी त्याने बिनीवाले तलाठीच्या नावाने १० हजारांच्या लाचेची मागणी केली. शेतकऱ्याने याबाबत एसीबीच्या अधीक्षक माधुरी कांगणे यांच्याकडे तक्रार केली. कांगणे यांनी पोलिस निरीक्षक चैनसिंग गुसिंगे यांना खातरजमा करून कारवाईच्या सूचना केल्या.
कोल्हेने तडजोडीअंती ८ हजारांची मागणी केली.
एल.सी.बी.च्या अधिकाऱ्यांनी तक्रारदार शेतकरी यांना कार्यवाही पुर्वी काही गोपनीयता बाळगण्याच्या सुचना दिल्या होत्या.
कोतवाल कोल्हेने तलाठीला बिनीवाले यांना कॉल करून याबाबत विचारणा देखील केली. कोल्हेने पैसे घेतल्यावर तक्रारदार शेतकऱ्यांने आपल्या खांद्यावरचा गमछा खाली उतरवण्याचा इशारा देण्याचे ठरले होते. ठरल्याप्रमाणे दुपारी ४ वाजता तक्रारदाराने कोल्हेच्या हातात पैसे टेकवले आणि गमछा उतरवला. तेथेच दबा धरून बसलेल्या एल. सी. बी.चे अधिकारी गुसिंगे, बांगल, अंमलदार राजेंद्र नंदिले, युवराज हिवाळे, सी.एन.बागुल यांनी धाव घेत त्याला रंगेहाथ ताब्यात घेतले. सोबतच बिनीवाले तलाठीला देखील अटक केली. दोघांवरही पैठण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.