” अकरावी प्रवेशांसाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
पुणे
राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रांतील अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहेत. प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत तीन नियमित, तीन विशेष प्रवेश फेर्या राबवण्यात आल्या. मात्र काही विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी दैनंदिन गुणवत्ता फेरी अर्थात सतत विशेष फेरी सुरू करण्यात आली आहे. या फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र विद्यार्थ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आता १५ ऑक्टोबरपर्यंत प्रवेश फेरी सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांना संध्याकाळी सात ते सकाळी नऊ दरम्यान अर्ज करता येईल. तर सकाळी १० ते संध्याकाळी पाच दरम्यान प्रवेश घेता येईल. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचा पुढील दिवसाच्या फेरीसाठी आपोआप विचार केला जाईल. प्रवेशासाठी निवड होऊनही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्या महाविद्यालयासाठी पूर्ण फेरीदरम्यान प्रतिबंधित केले जाईल. प्रवेश नाकारलेल्या विद्यार्थ्यांनाही त्या महाविद्यालयासाठी प्रतिबंधित केले जाईल. यापुढे प्रवेश रद्द करण्याची परवानगी असणार नाही.