
” पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणारे आणि दहशतवाद्यांचे समर्थन करणाऱ्यांवर कडक कारवाई करा – नाना पटोले “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
मुंबई
“दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवल्याच्या आरोपाखाली NIA, ED या केंद्रीय यंत्रणांनी पुण्यासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी छापेमारी करून, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) संघटनेच्या अनेकांची धरपकड केली असता, पुण्यात काही जणांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या हे अत्यंत निषेधार्ह आहे. अशा घोषणा देणाऱ्या व दहशतवाद्यांचे समर्थन करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. कोणतीही संघटना धार्मिक उन्माद घालत असेल तर त्यावर बंदी घातली पाहिजे.” असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.
“राज्यात दहशतवादी कारवायांना कसलेही स्थान मिळता कामा नये, राज्यात शांतता राहिली पाहिजे हीच काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. महाराष्ट्रात अशा घटना घडायला नको आहेत. अशा प्रवृत्तींना राज्यातून ताकद मिळते काय? हे तपासले पाहिजे. हिंदू- मुस्लीम वाद निर्माण करून कोणी आपली राजकीय पोळी भाजत आहे का? याचीही सखोल चौकशी झाली पाहिजे. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा खपवून घेतल्या जाणार नाहीत, त्या लोकांवर कडक कारवाई करा.” असे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.