” सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंची निवड प्रक्रिया आता खऱ्या अर्थाने सुरू “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
पुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंची निवड प्रक्रिया आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. विद्यापीठाकडून कुलगुरू निवडीसाठी जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज मागवण्यात आले आहेत. साधारपणे पुढील अडीच महिन्यांत विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू मिळतील.
डॉ. नितीन करमळकर यांचा कुलगुरू पदाचा कार्यकाळ मे मध्ये संपला. त्यानंतर विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्याकडे सोपवण्यात आला. महाविकास आघाडी सरकारने विद्यापीठ कायद्यात केलेल्या बदलांना राज्यपालांनी मान्यता न दिल्याने कुलगुरू निवड प्रक्रिया रखडली होती.
राज्यात जुलैमध्ये सत्तांतर झाल्यानंतर राज्य शासनाने विद्यापीठ कायद्यातील प्रस्तावित बदल रद्द केले. त्यानंतर कुलगुरू निवड शोध समिती सप्टेंबबरमध्ये नियुक्त करण्यात आली. त्यानंतर जवळपास दीड महिन्यांनी कुलगुरू शोध समितीने विद्यापीठामार्फत शनिवारी जाहिरात प्रसिद्ध केली. इच्छुकांना अर्ज करण्यासाठी १४ डिसेंबरची मुदत देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आलेल्या अर्जांची छाननी, शोध समितीमार्फत मुलाखती आदी प्रक्रिया पूर्ण करण्यास साधारणपणे दोन ते अडीच महिने लागतील. त्यानंतर विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंची निवड होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.