” बालभारतीच्या पुस्तकातील वाचलेल्या गोष्टी म्हणजे इतिहास नव्हे “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
मुंबई
अभिजीत देशपांडे दिग्दर्शित हर हर महादेव हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटावरुन जोरदार वाद रंगला आहे. या चित्रपटातील काही दृश्यांची मोडतोड केल्याचा आरोप केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्यातील लढाईवरुन हा वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटात चुकीच्या पद्धतीने ऐतिहासिक प्रसंग दाखविण्यात आल्याचे बोललं जात आहे. नुकतंच या चित्रपटातील दृश्यावरुन ‘हर हर महादेव’चे दिग्दर्शक अभिजीत देशपांडेंनी रोखठोक भूमिका घेतली आहे. ‘बालभारतीच्या पुस्तकातील वाचलेल्या गोष्टी म्हणजे इतिहास नव्हे’, असे अभिजीत देशपांडे म्हणाले.
अभिजीत देशपांडे यांनी नुकतंच ई-सकाळला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी हर हर महादेव चित्रपट, त्यात दाखवण्यात आलेला इतिहास, जाती-पातीचं राजकारण या सर्व मुद्द्यांवर भाष्य केले आहे. तसेच यावेळी त्यांनी चित्रपटांबद्दल सुरु झालेल्या वादावर टीकाही केली आहे. तसेच काही मुद्द्यांवर त्यांनी रोखठोक भूमिका घेतली आहे.
“मला त्याची गरज भासली नाही. मी काहीही खोटा इतिहास दाखवलेला नाही. मी किती खरा इतिहास दाखवला त्यासाठी मी पत्रकार परिषद घेतली. मी ती पत्रकार परिषदही घेणार नव्हतो. कारण मला जे बिनडोक लोक मला प्रश्न विचारतात, त्यांनी तो चित्रपट पाहिलेला नाही. चित्रपट न बघता बोलणाऱ्यांना मी गृहितच धरत नाही. मी पत्रकार परिषद का घेतली तर एका प्रेक्षकाची मारहाण झाली. ते मी सहन करणार नाही. मी कायदेशीररित्या सेन्सॉर बोर्डाला जे दस्ताऐवज दिले. त्यानंतर सेन्सॉरकडून मला परवानगी मिळाली. तेच मी पत्रकारांसमोर ठेवले. त्यांच्यासमोर पुस्तकाचे नावही ठेवले. त्या लेखकाबद्दलही सांगितलं. त्यावेळी मी माझी संपूर्ण भूमिका मांडली होती. कालचं पुस्तक घेऊन मी चित्रपट केलेला नाही. मला वैयक्तिक पातळीवर धमक्या येत आहेत. ते फार दिवसांपासून सुरु आहे.
मला खरंच या गोष्टींची अक्कल नाही. जात-पात काय असतं याबद्दल माहिती नाही. मी चांगले लोक असतील तर त्यांच्याबरोबर काम करतो, वाईट असतील त्यांच्याबरोबर करत नाही. कोणतं आडनाव कोणाचं हे पण मला कळत नाही. मला ब्राह्मण, मराठा, कुणबी यासारख्या कोणत्याही गोष्टीत रस नाही. मी चित्रपट करण्यामागचं नेमकं कारण म्हणजे छत्रपती शिवरायांची कधीही न दाखवण्यात आलेली बाजू. महाराजांच्या मनातील जी युद्ध आहेत त्यांना किती दंद्व आहेत त्यावर त्यांनी कसा विजय मिळवून सुंदर महाराष्ट्र उभा केला हे मला दाखवायचे होते. त्यांनी किती दु:ख होतं हे मला दाखवायचे आहे. पण यावरुन राजकारण होईल, हे मला माहिती नव्हते. पण आता मला ते समजायला लागलं आहे.
मी यामुळे मी यापुढे महाराजांवर चित्रपट करणार नाही असं काहीही नाही. मी याहूनही मोठा भव्य चित्रपट करणार आहे. त्यांना हवं तसा नाही तर मला हवा त्याप्रकारे, इतिहासाला धरुन मी यापुढचा चित्रपट करणार आहे. मी महाराजांची एक वेगळी बाजू दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, म्हणून हा वाद झाला आहे. मी इतिहासात चुकीचं काय दाखवलं हेच मला कळत नाही.
महाराज आणि बाजीप्रभूंची झालेली लढाई हा मुळात मुद्दा आहे. तुम्ही कोण आहात, तुम्ही इतिहास वाचला आहे का? बालभारतीच्या पुस्तकातील वाचलेल्या गोष्टी म्हणजे इतिहास नव्हे. इतिहास म्हणजे एक विश्लेषण असतं. त्यात वस्तूस्थिती असते. कुठेतरी काही तरी गोष्ट सांगितली त्याला तुम्ही इतिहास मांडता तो इतिहास नसतो. महाराज आणि बाजीप्रभूंची झालेली लढाई कधीही झालेली नाही, हे जेव्हा लोक म्हणतात तेव्हा मला त्यांच्या आत्मविश्वासाचा हेवा वाटतो. अनेक इतिहासकारांची पुस्तक आहेत, त्यामुळे मला हे माहिती आहे, असे अभिजीत देशपांडेंनी सांगितले.