” पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर गोळीबार “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
मुंबई
आज दुपारच्या सुमारास पाकिस्तानच्या वझिराबादमधील झफऱ अली खान चौकात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर आज एका सभेदरम्यान गोळीबार झाला. या घटनेमध्ये इम्रान खान जखमी झाले असून त्यांच्या पायाला जखम झाल्याची माहिती समोर आली आहे. इम्रान खान अध्यक्ष असलेल्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ या पक्षानं निवडणुका मागे घेण्याची मागणी करत लाहोर ते इस्लामाबाद असा मोर्चा काढला आहे. या मोर्चादरम्यानच इम्रान खान यांच्यावर गोळीबार झाल्यामुळे पाकिस्तानमधील वातावरण चांगलंच तापलं आहे. हा हल्ला कोणत्या हेतूने करण्यात आला? यासंदर्भात पाकिस्तानमधील तपास यंत्रणा तपास करत असताना अटक करण्यात आलेल्या एका हल्लेखोराचा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये इम्रान खान यांच्यावर गोळ्या झाडण्यामागचं खरं कारण हल्लेखोर सांगत असल्याचं दिसत आहे.
मोर्चा मुख्य चौकात आल्यानंतर अचानक गोळ्या झाडल्याचे आवाज आल्यामुळे घटनास्थळी एकच खळबळ उडाली. लोकांची पळापळ सुरू झाली. या गोंधळात इम्रान खान यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना लागलीच रुग्णवाहिकेतून रुग्णालयाकडे रवाना केलं. इकचे पोलिसांनी तातडीने पावलं उचलत गर्दीतून हल्लेखोराला हेरलं आणि त्याला अटक केली.
यानंतर ट्विटरवर काही युजर्सकडून एक व्हिडीओ व्हायरल केला जात आहे. यात काही पोलीस अधिकारी एका व्यक्तीची चौकशी करत असून ही व्यक्ती इम्रान खान यांच्यावर गोळी झाडल्याची माहिती देत असल्याचं दिसत आहे. हाच इम्रान खान यांच्यावरील हल्लेखोर असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडीओमध्ये हल्लेखोरानं इम्रान खान यांच्यावर गोळ्या झाडल्याचं कबूल केलं आहे.
“इम्रान खान लोकांना फसवत होता. मला हे पाहावलं नाही. मग मी त्याला मारण्याचा प्रयत्न केला. मी प्रयत्न केला की त्याला जीवे मारू शकेन. फक्त इम्रान खानलाच मारण्याचं मी ठरवलं होतं. इतर कुणालाही नाही. एकीकडे अजान सुरू होती आणि दुसरीकडे हे डेक लावून आरडा-ओरडा करत होते. याचा विचार करून माझ्या डोक्यात हे आलं”, असं ही व्यक्ती बोलताना व्हिडीओमध्ये दिसत आहे.
“ज्या दिवशी इम्रान खान लाहोरवरून निघाला, त्या दिवसापासून मी ठरवलं की मी त्याला सोडणार नाही. त्याला मारण्याचं नियोजन करून मी निघालो. माझ्यामागे कुणीही नाही. मी कुणाच्याही सांगण्यावरून हे केलेलं नाही. माझ्यासोबत कुणीही नाही. मी एकटाच आहे. माझ्या घरून मी माझ्या बाईकवर एकटाच आलोय. माझी बाईक मी माझ्या मामांच्या दुकानावर लावली”, असंही या हल्लेखोरानं पाकिस्तानमधील पोलिसांना संगितलं आहे.
दरम्यान, या हल्ल्याचा पाकिस्तानमधील सत्ताधाऱ्यांनी निषेध केला आहे. इम्रान खान यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असल्याची माहिती पाकिस्तानमधील स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिली आहे.