” शिंदे-फडणवीस सरकारकडून राज्यातील जनतेची दिशाभूल – अतुल लोंढे “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
मुंबई
वेदांत व वेदांत-फॉक्सकॉन हे दोन वेगळे प्रकल्प आहेत. वेदांत हा प्रकल्प मोबाइल निर्मितीचा, तर वेदांत-फॉक्सकॉन हा प्रकल्प सेमी कंडक्टकर निर्मितीचा आहे. मात्र हे दोन प्रकल्प एकच असल्याचे सांगून शिंदे-फडणवीस सरकारकडून राज्यातील जनतेची दिशाभूल केली जात आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली. शिंदे-फडणवीस सरकारच्या नाकर्तेपणामुळेच फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याचे त्यांनी सांगितले.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वेदांतमधील गुंतवणुकीबाबत खोटी माहिती देत असल्याचा लोंढे यांचा आरोप आहे. वेदांतचा प्रकल्प फडणवीस यांच्या काळातच आला आणि गेला, तो प्रकल्प मोबाइल निर्मितीचा होता. तर वेदांत-फॉक्सकॉन सेमी कंडक्टर निर्मितीचा प्रकल्प होता. या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यात एक लाख ५६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येणार होती. तसेच एक लाख रोजगारनिर्मितीची त्यातून अपेक्षा होती. याबाबत मंत्रालयात १५ जुलै २०२२ रोजी सहा-सात विभागांच्या सचिवांची बैठक झाली. त्यात वेदांत-फॉक्सकॉनला पाणी, वीज, जमीन व विविध कर यांमध्ये सवलती देण्यावर निर्णय झाला होता. तरीही हा प्रकल्प गुजरातमध्ये गेला, त्याला राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा नाकर्तेपणा जबाबदार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.