
” अंधेरी निवडणूक – सकाळी साडेसहापासूनच मतदारांच्या रांगा “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
मुंबई
अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. एकतर्फी होणाऱ्या या लढतीत मतदारांना घराबाहेर काढण्याचे शिवसेनेसमोर मोठे आव्हान असेल तरी सुरुवातीच्या पहिल्या तासामध्ये अनेक ठिकाणी मतदानासाठी रांगा लागल्याचं शिवसेनेच्या दृष्टीने दिलासादायक चित्र पहायला मिळालं. मतदारांमधील निरुत्साह असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असली तरी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये वेगळं चित्र दिसून येत आहे. शिवसेनेतील बंडानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) या नावाने उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके या धगधगती मशाल या चिन्हासहीत ही निवडणूक लढवत आहेत.
राजश्री शाहू महाराज शाळेतील मतदान केंद्रावर सकाळी साडेसहा वाजल्यापासूनच रांगा लावण्यास सुरुवात झाली होती. सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. अनेक मतदान केंद्रांवर कामाला जाण्याच्या आधी मतदान करण्याच्या दृष्टीने अनेकांनी सकाळी साडेसहापासून रांगा लावून मतदान केल्याचं पहायला मिळालं. अंधेरी पूर्व मतदारसंघामध्ये दोन लाख ७१ हजार मतदार आहेत. एकूण ३८ ठिकाणी २५६ मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. ठाकरे गटाच्या उमेदवार असलेल्या ऋतुजा लटके या चिनाई कॉलेजमधील मतदानकेंद्रावर सकाळी दहा वाजता मतदान करणार असल्याची माहिती समोर आली आहे. लटकेंविरोधात सात उमेदवार या निवडणुकीमध्ये उभे आहेत.
अंधेरी पूर्व मतदारसंघात भाजपच्या माघारीमुळे पोटनिवडणुकीतील चुरस संपली. तसेच भाजपाच्या माघारीमुळे पोटनिवडणूक होणारच नाही, असे चित्र निर्माण झाले. या पार्श्वभूमीवरच मतदान किती होते याची शिवसेनेला चिंता आहे. जास्तीत जास्त मताधिक्याने ही जागा जिंकण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. आपले हक्काचे मतदार घराबाहेर पडावेत म्हणून शिवसेनेने आजूबाजूच्या परिसरातील शिवसैनिकांना अंधेरीत पाठविले आहे. घरोघरी जाऊन मतदानासाठी बाहेर या, असे आवाहन कार्यकर्ते मतदारांना करणार आहेत.
पोटनिवडणुकीतील चुरस संपल्याने मतदारांमध्येही निरुत्साह जाणवतो. तरीही आम्ही जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचून मतदानाकरिता बाहेर यावे, असे आवाहन केले आहे, असे शिवसेना नेते अनिल परब यांनी सांगितले. मतदारांना घराबाहेर काढण्याचे मोठे आव्हान असेल. महाविकास आघाडीचे हक्काचे मतदार घराबाहेर पडतील, असा विश्वास परब यांनी व्यक्त केला.