” दहावीचे परीक्षा अर्ज भरण्यास उद्यापासून सुरुवात “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
पुणे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या नियमित विद्यार्थ्यांना बुधवारपासून (१९ ऑक्टोबर) ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. नियमित विद्यार्थ्यांना १० नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येईल.
राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. दहावीचे परीक्षा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरायचे असल्याने ते शाळेमार्फत भरणे आवश्यक आहे. नियमित विद्यार्थ्यांसह पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, तसेच श्रेणी सुधार, तुरळक विषय घेऊन परीक्षेस बसणारे, आयटीआयद्वारे ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेण्याऱ्या विद्यार्थ्यांना ११ ते १५ नोव्हेंबर दरम्यान परीक्षा अर्ज भरता येईल.
नियमित विद्यार्थ्यांचा ऑनलाइन परीक्षा अर्ज भरताना सरल प्रणालीवर विद्यार्थ्यांची नोंद असणे आवश्यक आहे. २० ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबर या कालावधीत शाळांना चलनाद्वारे परीक्षा शुल्क बँकेत जमा करता येईल. तर माध्यमिक शाळांनी शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या १ डिसेंबरला विभागीय मंडळात जमा करायच्या असल्याचे स्पष्ट करण्यात आले.