” बंजारा समाज आता कुठेही वंचित राहणार नाही – एकनाथजी शिंदे “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
मुंबई
आज रविवार दि. १६ ऑक्टोबर २०२२ रोजी ऑल इंडिया बंजारा सेवा संघ आयोजित मा. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा भव्य सत्कार समारंभ पार पडला. डॉ. शंकर पवार अध्यक्ष, ऑल इंडिया बंजारा सेवा संघ यांच्या नेतृत्वाखाली या मेळाव्याचे आयोजन ठाण्यातील हायलँड मैदानात करण्यात आले होते.
या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, ना. संजय राठोड (अन्न व प्रशासन मंत्री), ना. कपिल पाटील केंद्रीय राज्यमंत्री, डॉ. उमेश जाधव खासदार (गुलबर्गा), डॉ.. श्रीकांत शिंदे खासदार ठाणे, मा. नरेश मस्के माजी महपौर, मा. देवराम भोईर, मा. संजय भोईर, मा. अशोक शिनगारे जिल्हाधिकारी ठाणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. शिंदे साहेबांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी डॉ. शंकर पवार यांनी बंजारा समजाच्या विविध मागण्या मा. मुख्यमंत्र्यांकडे लेखी निवेदनाद्वारे सादर केल्या.
१) मुंबईत किंवा ठाण्यात शासनातर्फे बंजारा बांधवांसाठी “बंजारा भवन” बांधण्यात यावे.
२) महाराष्ट्रात तांडा डेव्हलमेंट कॉरपोरेशन तयार करण्यात यावे व तांडयाला महसूली दर्जा देऊन तांडयाच्या विकासाकरिता स्वतंत्र आर्थीक तरतूद करण्यात यावी.
३) महाराष्ट्र राज्यात बंजारा समाजाला अनुसुचित जमाती (SC/ST) मध्ये समाविष्ट करण्यात यावे.
४) बंजारा भाषेला आठव्या सूची मध्ये समाविष्ट करण्यासाठी केंद्र शासनाकडे यथाशीघ्र शिफारस करण्यात यावी.
५) मुंबई शहरात व महाराष्ट्राच्या अनेक शहरात कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलगांना आणि मध्य प्रदेश चे बंजारा बांधव गेल्या ६० वर्षापासून बांधकाम मजूर म्हणून वास्ताव्यास आहेत. त्या बांधकाम मजूरांना जातीचा दाखला व रहिवाशी दाखला विना अडथळा प्रदान करण्याचे आदेश दयावे.
६) नाका कामगार आणि बिगारी काम करणाऱ्या बंजारा समाज बांधवाना सरकारच्या माध्यमातून कायस्वरुपी पक्की घरे बांधून दयावीत.
७) बंजारा समाज गावापासून दूर जंगलात दऱ्या खोऱ्यात राहणारा असून महाराष्ट्रातील अनेक तांडे गायरान जमिनी आणि वन विभागाच्या जमिनीवर शेती करून आपला उदर निर्वाह करतो सदरील जमीन भोगवटा धारकांना त्रास देऊ नये आणि त्यांना कायम स्वरुपी मालकी हक्कावर त्या जमिनी देण्यात यावी.
८) बंजारा समाजावर क्रिमीलेअरची अट लागू न करण्याची शिफारस केलेली आहे. म्हणून बंजारा समाजाला नॉन क्रिमीलेअर मधून वगळण्यात यावे.
९) पोहरादेवी, जि. वाशिम येथे तयार होणाऱ्या नंगारा भवनाला निधी उपलब्ध करुन दयावा जेनेकरुन अपूर्ण राहीलेले काम लवकर पूर्ण होईल.
१०) बंजारा समाजाचे आराध्यदैवत संत श्री सेवलाल महाराज यांची जंयती दिनांक १५ फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात येत असून त्या दिवशी शासकीय सुटटी जाहिर करण्यात यावी हि नम्र विनंती.
मी ट्रेलर म्हणून काम करतो तर, मुख्यमंत्री आल्यावर पिक्चर सुरू होतो, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात बोलताना केले. पोहरादेवी ठिकाणाचा विकास करून त्याला जागतिक दर्जाचे स्थळ करण्यासाठी आम्ही १०० कोटींचा निधी मंजूर केला होता. पण, गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारने एकही पैसा दिला नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. ट़याटु चे खरे जनक हा बंजारा समाजच आहे असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी बंजारा भाषेतून उपस्थितांशी संवाद साधला. महाविकास सरकारमध्ये मंत्री होतो, त्या सरकार मध्ये मला जो अनुभव आला, तोच अनुभव मंत्री संजय राठोड यांना आला. चांगले दिवस असतील तर सर्वच असतात. पण, संकटकाळी सोबत राहतो, तोच खरा मित्र असतो. तसाच संकट काळात सहकाऱ्यांच्या सोबत उभा राहणे, हा माझा स्वभाव असून मंत्री संजय राठोड यांच्यावर आलेल्या संकटावेळी मी त्यांच्या पाठीशी उभा राहिलो, असे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.
दिलेला शब्द पाळतो म्हणूनच ४० आमदार माझ्यासोबत आले. शब्द दिला की मी माघर घेत नाही हाही माझा स्वभाव आहे. मंत्री संजय राठोड यांना हे चांगले माहीत आहे, असेही ते म्हणाले. बंजारा समाजाने महाराष्ट्राच्या विकासामध्ये मोठे योगदान दिले आहे. जिद्द, चिकाटी आणि मेहेनतीमुळे हा समाज विकासाच्या मुख्य प्रवाहात येत आहे. आता हा समाज कुठेही वंचित राहणार नाही कारण आता जनतेचे सरकार आले आहे, असेही ते म्हणाले.
बंजारा समाजाचे भवन उभारण्यासाठी नवी मुंबई येथे जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना सिडको अधिकाऱ्यांना देईल. पोहरादेवी विकासाचे बंद पडलेले काम तातडीने सुरू करण्यात येईल आणि सेवालाल महाराज जयंतीच्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सुट्टी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे मा. मुख्यमंत्री यांनी सांगितले.