
” संजय देशमुखांच्या ताकदीला बळ देण्याचा विचार “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्यातील माजी राज्यमंत्री तथा भाजप नेते दिग्रसचे माजी आमदार संजय देशमुख २० ऑक्टोबरला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून प्रवेश करणार आहेत. देशमुख यांच्या प्रवेशानं यवतमाळमध्ये सेनेचं मोठ्या प्रमाणावर डॅमेज कंट्रोल होणार असल्याचं बोललं जातंय.
दिग्रस मतदारसंघाच्या राजकारणात आतापर्यंत दोन ‘संजय’ महत्वाचे ठरले आहेत. संजय देशमुखांना मात देत सध्या संजय राठोड यांचे मतदारसंघात वर्चस्व आहे. मुळात हे दोघेही शिवसेनेतूनच पुढे आले आहे.दोघेही जिल्हाप्रमुख होते.मात्र पक्षाने संजय राठोड यांनी झुकते माप दिल्यानंतर संजय देशमुख अपक्ष लढले.आमदार संजय राठोड यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केल्याने दिग्रस मतदारसंघात त्यांना मात देण्यासाठी पुन्हा संजय देशमुख यांना पुढे आणण्याचा शिवसेनेचा प्लॅन आहे .२० ऑक्टोबरला संजय देशमुख ‘मातोश्री’वर शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
संजय देशमुखांनी १९९९ ते २००९ असे १० वर्ष दिग्रस मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. विशेष म्हणजे दोन्हीवेळी त्यांनी अपक्ष म्हणून विजय मिळवला होता.मात्र,२००९ मध्ये संजय राठोड यांच्याकडून पराभवानंतर संजय देशमुख मतदारसंघाच्या राजकारणात मागे पडले. मात्र, दिग्रसमधील नगरपालिका, पंचायत समिती, बाजार समिती, खरेदी-विक्री संघ अशा ठिकाणी प्रत्येकदा देशमुखांनी आपली ताकद दाखवली आहे.
२०१९ मधील विधानसभा निवडणुकीत संजय देशमुखांनी संजय राठोडांच्या विरोधात अपक्ष लढत ७५ हजार मतदान घेतले होते. संजय देशमुखांच्या याच ताकदीला आता बळ देण्याचा विचार सेना नेतृत्वाने केला आहे.