
” महागाव ते नांदेड जीवघेणा प्रवास “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
महागाव
महागाव ते वारंगा नॅशनल हायवे रस्ता ठिकठिकाणी पडलेल्या खड्यांमुळे मृत्यूचा सापळा बनला आहे. या मार्गावरील प्रकल्प संचालकांचा दुर्लक्षितपणा अनेकांच्या मृत्यूचे कारण बनला आहे. नागपूर ते नांदेड या मार्गावर जड वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. कच्चा माल घेऊन जाणारे सर्वाधिक वाहन याच रस्त्याने जातात. मात्र, नॅशनल हायवेचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. अनेक ठिकाणी बायपास व पुलाचे काम रखडले आहे. तेथे तीन ते पाच फुटांचे खड्डे पडले आहे. नाइलाजामुळे जड वाहतुकीची वाहने कशीबशी समोर हाकली जात आहे. मात्र, छोट्या वाहनांसाठी या रस्त्यावरील प्रवास जीवघेणा ठरत आहे.
संबंधित एजन्सी अतिशय संथगतीने काम करीत असल्यामुळे गेल्या चार वर्षांपासून या रस्त्यावरील वाहतूक अद्याप सुरळीत झाली नाही. रस्त्याच्या कामाची लायबिलिटी १५ वर्षेपर्यंत राहणार आहे. त्यापैकी चार वर्षे निघून गेले. तसेच वृक्षारोपण अद्यापही करण्यात आले नाही. ठिकठिकाणच्या खड्ड्यांमुळे अपघाताची मालिका सुरू आहे. आतापर्यंत डझनभर मृत्यू झाले असून कित्येकांना अपंगत्व आले आहे. वाहनांचे होत असलेले नुकसान वेगळेच आहे. प्रवासी वाहनधारक यांना आर्थिक, मानसिक मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रत्येक ठिकाणच्या उड्डाण पुलाजवळील बायपासवर पडलेले खड्डे जीवघेणे ठरत आहे. केंद्र सरकार गाजावाजा करून नॅशनल हायवेचे काम करीत आहे. मात्र, अर्धवट कामामुळे नागरिकांना काय मनस्ताप सहन करावा लागत आहे, याचे भान राखले जात नाही. त्यामुळे केंद्र सरकार व रस्ते वाहतूक मंत्री यांच्याविषयी जनतेत प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
शुक्रवारी सकाळी तालुक्यातील मुडाणा येथे उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूला मोठमोठे खड्डे पडल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प पडली होती. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. खड्यांमधून मार्ग काढताना वाहन चालकांच्या नाकीनऊ येत होते. नागपूर-तुळजापूर मार्गावरील आणी ते मार्लेगाव दरम्यान आतापर्यंत ९६ अपघात झाले. त्यात ४९ जणांचे बळी गेले. ११४ जण गंभीर जखमी झाले. ही सर्व आकडेवारी पोलीस दप्तरी नोंद आहे.