
” मुंबई महानगरपालिकेच्या जंतनाशक गोळ्या निकृष्ट दर्जाच्या “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
मुंबई
मुंबईत घरोघरी फिरून आरोग्य सेवा देणाऱ्या आरोग्य सेविकांना सध्या जंतनाशक गोळ्या वाटपाचे काम दिले आहे. मात्र या गोळ्या बाहेर काढताच लगेचच त्याचा चुरा होत असल्याचे आढळून आले आहे. तसेच या गोळ्यांचे सेवन केल्याने मुलांना उलट्या होतात असाही अनुभव काहींना आल्याचे आरोग्य सेविकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या गोळ्यांच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. या गोळ्यांची मुदत संपली असावी, अशीही शंका त्यांनी उपस्थित करण्यात येत आहे.
या प्रकारामुळे आरोग्य सेविकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हे प्रकार लक्षात येताच महानगरपालिका आरोग्यसेवा कर्मचारी संघटनेने गोळ्यांचे वाटप बंद करण्याची सूचना आरोग्य सेविकांनी केली. कोणतीही अनुचित घटना घडल्यास आरोग्य सेविकांना वस्त्यांमध्ये फिरणे कठीण होईल. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतल्याचे संघटनेच्या वतीने ॲड. प्रकाश देवदास यांनी सांगितले. याबाबत आरोग्य विभागाशी चर्चा झाल्यानंतरच गोळ्या वाटपाचे काम सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, यासंदर्भात आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांची बाजू समजू शकली नाही.