
” अभिनेते अशोक सराफ यांना ‘झी टॉकीज’चा मानाचा मुजरा “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
मुंबई
मराठी चित्रपटसृष्टीत विनोदी चित्रपटांचा काळ गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना नुकतेच ‘झी टॉकीज कॉमेडी पुरस्कार २०२२’च्या मंचावर विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार प्रदान करताना संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दणाणून गेले होते.चित्रपटसृष्टीतील कलाकारांपासून राजकीय नेत्यांपर्यंत अशोक सराफ यांच्या अभिनयाचे चाहते मोठ्या प्रमाणावर आहेत. अशोक सराफ यांच्या वयाची पंच्याहत्तरी आणि अभिनय कारकीर्दीची पन्नाशी या दुग्धशर्करा योगाचे औचित्य साधत यंदाचा झी टॉकीज कॉमेडी पुरस्कार सोहळ्यात हा क्षण खास थाटामाटात साजरा करण्यात आला.
अशोक सराफ यांच्याकडे अभिनयाची ताकद आणि विनोदाच्या टायमिंगची किल्लीच होती. ‘पांडू हवालदार’, ‘धूमधडाका’, ‘बिनकामाचा नवरा’, ‘गंमत जम्मत’, ‘वजीर’, ‘चौकट राजा’ अशा अनेक चित्रपटांमध्ये कधी विनोदी, तर कधी गंभीर अशा भूमिका त्यांनी उत्तम वठवल्या.