
” मराठी भाषेतील पाट्या नसलेल्या दुकानांवर सोमवारपासून कारवाई “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
मुंबई
वारंवार मुदतवाढ देऊनही दुकानांवर मराठी नामफलक लावण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या दुकानदारांवर सोमवारपासून कारवाई करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. चौथ्यांदा दिलेली मुदतवाढ संपुष्टात आल्यानंतर अखेर आता महानगरपालिकेला दुकानांवरील कारवाईसाठी मुहूर्त मिळाला आहे. पहिल्या टप्प्यात विभागवार दुकानांची पाहणी करण्यात येणार आहे. दुकानावर मराठी भाषेतील नामफलक नसल्यास संबंधित दुकानदाराला सात दिवसांची नोटीस देण्यात येणार असून त्यानंतर कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
दुकाने व आस्थापना विभागातील निरिक्षक विभागातील दुकानांचे सर्वेक्षण करतील व त्यानंतर आधी मुख्य रस्त्यांवरील दुकानांवर कारवाई केली जाऊ शकते. दकाने व आस्थापनांच्या मालकांवर महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमातील तरतुदीनुसार दुकानांदारांवर प्रति कामगार दोन हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे. तसेच न्यायालयीन खटलाही दाखल होऊ शकतो.