
” मुख्यमंत्री शिंदेंचं भाषण सुरु असतानाच बी. के. सी. मैदानातील लोक उठून निघून गेले “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
मुंबई
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाचा पहिलाच दसरा मेळावा बुधवारी वांद्रे-कुर्ला संकुलामधील एमएमआरडीच्या मैदानावर पार पडला. मुख्यमंत्री शिंदे हे सभास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांचे व्यासपीठावर आगमन होताच, उपस्थित जनसमुदायाने टाळय़ांचा कडकडाट करत ‘शिंदे साहेब आगे बढो, शिवसेना जिंदाबाद’ च्या जयघोषात त्यांचे स्वागत केले. यावेळी शिंदे यांना १२ फूट लांबीची चांदीची तलवार भेट देण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणामध्ये प्रामुख्याने ठाकरे कुटुंबाबरोबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केल्याचं पहायला मिळालं. मुख्यमंत्री शिंदे यांचं भाषण जवळजवळ दीड तास सुरु होते. रात्री साडेआठच्या आसपास मुख्यमंत्री शिंदे यांनी भाषणाला सुरुवात केली आणि ते दहा वाजेपर्यंत बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे हे आपल्या भाषणातील मुद्दे बऱ्याच वेळा समोर ठेवलेल्या कागदांवरुन वाचून दाखवताना दिसले. तसेच अनेकदा ते घड्याळाकडेही पाहताना दिसले. दहा वाजल्यानंतर ध्वनीक्षेपकाचा वापर करता येत नाही या नियमामुळेच मुख्यमंत्री अनेकदा वेळ तपासून पाहत होते अशी चर्चा सोशल मीडियावर आहे. मात्र असं असतानाच सोशल मीडियावर शिंदेंचं भाषण सुरु होतं त्यावेळी अनेक समर्थक खुर्चांवरुन उठून निघून जाताना दिसत होते. मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरु असतानाच लोक निघून जात असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.