
” हिंदूत्वाबाबत तडजोड नाही – उद्धव ठाकरे “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
मुंबई
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी शिवतीर्थ दसाऱ्या मेळाव्याच्या वेळी हिंदूत्वाबाबत तडजोड नसल्याचे स्पष्ट करत भाजपसह शिंदे गटाला लक्ष्य केले. ‘‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत मशिदीत गेलेले चालतात. लालकृष्ण अडवाणी यांनी पाकिस्तानात जाऊन जिनांच्या थडग्यावर माथे टेकवले किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवाझ शरीफांच्या वाढदिवसाला जाऊन केक कापला, त्यात भाजपला काही वावगे वाटत नाही. पण, आम्ही काँग्रेसबरोबर आघाडी केली तर हिंदूत्व सोडले, अशी आवई उठवली जाते. याच न्यायाने भागवत मशिदीत गेले म्हणजे भाजप-संघ परिवाराने हिंदूत्व सोडले असे मानायचे का, असा सवाल त्यांनी केला.
‘‘आमचे हिंदूत्व देशाशी जोडलेले आहे, तुमचे हिंदूत्व हे शेंडी- जानव्याशी जोडलेले आहे. नुसती जपमाळ करून कोणी हिंदू होत नाही. भाजपने मेहबूबा मुफ्ती यांच्याबरोबर जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन केले होते. त्यावेळी हिंदूत्व कुठे गेले होते, असा सवाल करीत देशप्रेमी मुस्लीम किंवा अन्य धर्मीय हे आमच्यासाठी हिंदूच आहेत, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. राज्यात फडणवीस सरकार असताना औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव केले नव्हते. ते आमच्या सरकारने केले आणि त्यावेळी शिवसेनेच्या प्रस्तावास काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने तात्काळ पाठिंबा दिला होता, याकडेही ठाकरे यांनी लक्ष वेधले.