” पीएच.डी., एम.फिल. साठी जास्तीचे शुल्क आकारल्यास संशोधन केंद्राची मान्यता रद्द “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
पुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये व संशोधन केंद्रांमध्ये पीएच.डी., एम.फिल. करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून विद्यापीठाकडून ठरवलेले शुल्कच आकारण्याचे स्पष्ट आदेश संशोधन केंद्र व विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांना देण्यात आले आहेत. विद्यापीठाने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा अधिक शुल्काची मागणी केल्यास किंवा शुल्क आकारल्यास संबंधित संशोधन केंद्रांची मान्यता रद्द करण्याची तंबी विद्यापीठ प्रशासनाने दिली.
विद्यापीठाचे विभाग, संलग्न महाविद्यालये आणि संशोधन केंद्रांमध्ये पीएच.डी., एम.फील प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेदरम्यान विद्यापीठाने ठरवलेल्या शुल्कापेक्षा अधिक शुल्क आकारले जात असल्याच्या अनेक तक्रारी विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आल्या आहेत. या तक्रारींची दखल घेऊन विद्यापीठ प्रशासनाने घेत परिपत्रक प्रसिद्ध केले. परिपत्रकाद्वारे सर्व संशोधन केंद्रे आणि महाविद्यालयांना सूचना देत कोणत्याही परिस्थितीत पीएच.डी., एम.फिल.साठी जास्तीचे शुल्क आकारले जाऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
काही विद्यार्थी संघटनांनी दिलेल्या माहितीप्रमाणे पीएच.डी. करताना विद्यार्थ्यांकडून किती शुल्क घ्यावे, याबाबत विद्यापीठाकडून शुल्करचना करण्यात आली आहे. त्या रचनेनुसारच शुल्क आकारणी करणे बंधनकारक आहे; तरीदेखील काही संशोधन केंद्रांमध्ये ठरलेल्या शुल्कापेक्षा काही हजार रुपये अधिकचे आकारले जाणे ही बाब गंभीर असून, असे आढळल्यास संबंधित संशोधन केंद्र बंद करण्याची ताकीद विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसेच ज्या संशोधन केंद्रांमध्ये जादाचे शुल्क आकारले जात असल्याचे आढळून आले आहे, अशा काही केंद्रांना विद्यापीठ प्रशासनाने पत्र पाठवून विचारणा केली आहे. या केंद्रांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास त्यांची मान्यता रद्द केली जाणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.