
” चांदणी चौकातील वाहतुकीत बदल “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
पुणे
मुंबई-बेंगळुरु महामार्गावरील चांदणी चौकातील वाहतुककोंडी सोडविण्यासाठी जूना उड्डाणपूल पाडण्यात येणार आहे. रविवारी (उजाडता २ ऑक्टोबर) मध्यरात्री दोन वाजता हा पूल जमीनदोस्त करण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी (१ ऑक्टोबर) रात्री ११ वाजल्यापासून रविवारी (२ ऑक्टोबर) सकाळी आठ वाजेपर्यंत चांदणी चौकातील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत मुंबईकडून साताऱ्याकडे आणि साताऱ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या हलक्या वाहनांसाठी प्रशासनाने पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले आहेत.
चांदणी चौकातील जूना उड्डाणपूल पाडण्याबाबत संबंधित यंत्रणांची बैठक झाल्यानंतर वाहतूक पोलीस उपआयुक्त राहुल श्रीरामे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘१ ऑक्टोबर रोजी रात्री ११ ते २ ऑक्टोबर सकाळी आठ या कालावधीत चांदणी चौकातील वाहतूक पूर्णपणे थांबविण्यात येणार आहे. या कालावधीत मुंबईकडून येणारी जड वाहतूक तळेगाव दाभाडे पथकर नाक्याच्या (टोल नाका) अलीकडे, तर साताऱ्याकडून येणारी जड वाहतूक खेड-शिवापूर परिसरात थांबविण्यात येणार आहे. पूल पाडण्याच्या कामासाठी वाहतूक बंद कालावधीत केवळ हलक्या वाहनांसाठी मुंबईकडून साताऱ्याकडे आणि साताऱ्याकडून मुंबईकडे जाण्यासाठी तीन पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. मात्र, या कालावधीत नागरिकांनी शक्यता प्रवास टाळावा. काही अत्यावश्यक कारणांसाठी प्रवास करायचा असल्यास पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत.’