
” नवरात्रोत्सव ‘नऊ दिवस’च साजरा का? “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
मुंबई
भारतातील अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा उत्सव म्हणून नवरात्रोत्सव याकडे पाहिले जाते. नवरात्रोत्सव हा दुर्गा देवीला समर्पित केला जातो. पण नवरात्र हा नऊ दिवसच का साजरा केला जातो? यामागे एक महत्त्वाचे कारण आहे.
संस्कृतमध्ये नवरात्र या शब्दाचा अर्थ “नऊ रात्री” असा आहे. या नऊ रात्री वेगवेगळया देवींची पूजा केली जाते. दहाव्या दिवशी विजयादशमी अर्थात दसरा असल्याने हा दिवस साडे तीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. सर्वत्र शारदीय नवरात्र म्हणून हा उत्सव प्रसिद्ध आहे. अनेक भाविक आपापल्या कुळाचाराप्रमाणे नवरात्रौत्सवात घटस्थापना करतात. नवरात्राच्या पहिल्या तीन दिवसात दुर्गेची पूजा केली जाते. या सर्व देवी ऊर्जा आणि शक्तीची देवता मानल्या जातात. नवरात्रात प्रत्येक दिवसाला आई दुर्गेच्या वेगवेगळया रूपाची पूजा केली जाते. यात कुमारी, पार्वती आणि काली रूपाचे पूजन महत्त्वाचे मानले जाते.
पूर्वी घरात धान्य नसायचं. श्रावणात पावसाळा असल्याने नवीन धान्य अश्विन महिन्यात घरात यायचं. त्यामुळे पूर्वी श्रावण, भाद्रपद महिन्यात काहीही नसायचे म्हणून उपवास करा असे सांगितले जायचे. पितृपक्षात सूर्य हा दक्षिण गोलार्धात प्रवेश करतो. दक्षिण गोलार्ध हा पितरांचा आणि उत्तर गोलार्ध हा देवांचा अशी प्राचीन ग्रंथात नोंद आहे. २३ सप्टेंबरला सूर्य हा दक्षिण गोलार्धात प्रवेश करतो हे विज्ञान आहे. म्हणून पितृपक्ष हा त्या काळात आहे.
नवरात्रीत सृजन शक्तीची पूजा असते. कारण त्यावेळी धान्य घरात येते. सृजन शक्ती आणि नऊ अंक याचं साम्य आहे. बी पेरल्यानंतर ९ दिवसात ते अंकुरते. गर्भधारणा झाल्यापासून ९ महिने ९ दिवसांनी मूल जन्माला येते. त्यामुळे निर्मिती किंवा सृजन म्हटलं की नऊ. त्यामुळे नऊ या संख्येला ब्रह्मसंख्या म्हटले जाते. जास्तीत जास्त मोठा अंक नऊ आहे, म्हणूनच नवरात्र ही नऊ दिवसांची मानली जाते. ती सृजन शक्तीची पूजा असते. या सर्व गोष्टी ऋतू आणि शेतीचे चक्र यावर आधारित आहे, असेही पंचागकर्ते दा. कृ. सोमण यांनी म्हटले आहे.