
” राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार – नाना पटोलें “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
मुंबई
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. शिवसेनेचे बंडखोर १६ आमदार अपात्र ठरले, तर राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार येऊ शकते, असे नाना पटोले म्हणाले आहेत. ‘टीव्ही ९ मराठी’ने याबाबतचे वृत्त दिले आहे. संविधानातील तरतुदीनुसारच ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी न्यायालयात युक्तीवाद केलेला आहे. त्यामुळे शिवसेनेतून बंड केलेले १६ आमदार अपात्र ठरले, तर राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार येऊ शकते, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
पीएफआय संस्थेवर करण्यात आलेल्या कारवाईवरही नाना पटोले यांनी भाष्य केले. भारत आणि पाकिस्तान असा वाद निर्माण करून राजकारण करणारी लोकं केंद्रात बसलेली आहेत. देशात दहशतवाद्यांना मदत करणारी अनेक कार्यालयं उघडली गेली आहेत. ही कार्यालयं केंद्राने अगोदर बंद करायला हवीत. मात्र सरकार यांच्या पाठीशी आहे. म्हणूनच पुण्यात पाकिस्तान झिंदाबादचे नारे देण्यात आले. या सर्वांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी आमची मागणी होती, असे नाना पटोले म्हणाले.