
” संभाजीराजे छत्रपतींचं एकनाथ शिंदेंना पत्र “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
मुंबई
किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी समोरच पिंडदानाचा विधी सुरू असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे. संभाजी ब्रिगेडने या घटनेची कसून चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. दरम्यान, संभीजाराचे छत्रपती यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं असून महाराजांना अभिवादन करण्याव्यतिरिक्त अन्य विधीस परवानगी नसावी अशी मागणी केली आहे.
शनिवारी रायगड किल्ल्यावर शाक्त पद्धतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा झाला. या कार्यक्रमाला संभाजी ब्रिगेडचे राज्यभरातील कार्यकर्ते आणि शिवप्रेमी मोठया संख्येने हजर होते. राजसदरेवरील राज्याभिषेकाचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व शिवप्रेमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी गेले. तेथे गेल्यावर तिथली परीस्थिती पाहून सारेच अवाक झाले.
त्या ठिकाणी काही लोक पिंडदानाचा विधी करत होते. पिठाचे गोळे, फुले व इतर साहित्य पाहून त्यांना हा पिंडदानाचा विधी असल्याची खात्री झाली. संभाजी ब्रिगेडचे कोकण विभागीय अध्यक्ष सुर्यकांत भोसले व तेथे आलेल्या अन्य शिवभक्तांनी हा प्रकार पाहिला आणि तिथं पिंडदान करणाऱ्या व्यक्तींना याचा जाब विचारला. मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली.