
” मी पण एक चित्ता घेऊन येणार,” रामदास आठवलें “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
मुंबई
भारतातून नामशेष झालेले चित्ते जवळपास ७० वर्षांनंतर भारतात परतले आहेत. आफ्रिकेच्या नामिबियातून आणलेले आठ चित्ते सध्या मध्य प्रदेशातील कुनो अभयारण्यात आहेत. या चित्त्यांना बघायला जाणार असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले आहेत. “चित्ते बघायला जाणार आणि मिळाल्यास त्यातील एक घेऊन येणार” असे मिश्किल वक्तव्य त्यांनी केले आहे. चित्त्यांवर जबरदस्त प्रेम असल्याचे पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना आठवले यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आम्ही या देशाच्या जंगलातील चित्ते आहोत, असे आठवले म्हणाले आहेत. राष्ट्रीय अभयारण्यातील एक चित्ता सहा वर्षांपूर्वी आठवले यांनी दत्तक घेतला आहे. जंगलांमध्ये चित्त्यांचे अस्तित्व आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, हे चित्ते पाहण्यासाठी प्राणी प्रेमींना काही महिने वाट पाहावी लागणार आहे. कुनो अभयारण्यातील या चित्त्यांवर लक्ष ठेवण्यासाठी ‘टास्क फोर्स’ तयार करण्यात आल्याची माहिती रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात दिली. “चित्ते बघायला कधी मिळणार असा प्रश्न मला बरेच जण विचारतात. हे चित्ते नवीन वातावरणाशी कसे जुळवून घेतात यासाठी टास्क फोर्स तयार करण्यात आली आहे. त्यांच्या निरीक्षणानंतरच याबाबत निर्णय घेतला जाईल”, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली आहे.