
” मुनगंटीवार ‘ॲक्शन मोड’मध्ये “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
चंद्रपूर
चंद्रपूर येथील राजुरा तालुक्यातील मूर्ती विमानतळ देशाच्या संरक्षण दलाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. या विमानतळाचे काम रखडल्यामुळे जिल्ह्यात येणारी जवळपास १० हजार कोटींची गुंतवणूक थांबली आहे. यामुळे विमानतळाचे रखडलेले काम विमानाच्याच गतीने पुढे गेले पाहिजे. सर्व परवानग्या तीन महिन्यात म्हणजे २४ डिसेंबर २०२२ पर्यंत मिळाल्याच पाहिजे. त्यासाठी काय करायचे ते तुम्हीच ठरवा. यापुढे कोणतेही कारण ऐकून घेतले जाणार नाही, अशा शब्दात राज्याचे वने, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना खडसावले.
नियोजन सभागृहात विमानतळाच्या सद्यस्थितीचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी संबंधित अधिकारी उपस्थित होते. २४ डिसेंबर २०२२ ही परवानग्या मिळवण्याची अंतिम तारीख अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावी. विमानतळ वेळेत झाले असते तर १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आली असती. याबाबत उद्योगपती रतन टाटा यांच्याशी बोलणेसुध्दा झाले होते. यातून जिल्ह्यातील किमान १० ते १५ हजार लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकला असता. यापुढे कोणतेही कारण ऐकूण घेणार नाही. विमानतळाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत त्याचे लोकार्पण करण्याचा आपला मानस आहे. त्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांनी कामाचे नियोजन करून रोज पाठपुरावा करावा, असे निर्देश पालकमंत्री मुनगंटीवार यांनी दिले.